लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला महाराष्ट्रात 4 पैकी फक्त एकच जागा जिंकता आली. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निमित्ताने रायगडमधील एकमेव जागा त्यांना जिंकता आली. दरम्यान सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील आपल्या विजयात काँग्रेसचाही मोठा वाटा होता असं विधान केलं आहे. सुनील तटकरे यांच्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल जनतेचे आभार मानण्‍यासाठी अलिबागमध्‍ये आले असता ते बोलत होते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीतील विजयात महायुतीमधील घटक पक्षांबरोबरच काँग्रेसनेही आपल्याला मदत केल्‍याचा दावा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे. शिवसेना भाजपा, राष्‍ट्रवादी काँग्रेसबरोबरच काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांनी केलेली मदत या सर्वांच्‍या बळावर मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्‍य मला यावेळी अलिबाग विधानसभा मतदार संघातून मिळाल्‍याचं तटकरे म्हणाले आहेत. सुनील तटकरे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबरच काँग्रेस कार्यकर्त्यांचेही आभार मानले आहेत. दरम्यान सुनील तटकरे यांच्‍या या दाव्‍यामुळे अनेकांच्‍या भुवया उंचावल्‍या आहेत.


पक्षात नाराजी नाही - अजित पवार


दरम्यान अजित पवारांनी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधाना सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरुन पक्षात नाराजी असल्याचं वृत्त धादांत खोटं असल्याचं सांगितलं आहे. "निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे लोक आपली मतं, भूमिका मांडत आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत आणि भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी केलेल्या टीका-टिप्पणीवर मला भाष्य करायचं नाही. मी फक्त विकासात लक्ष घातलं आहे. विकास करत आपला जिल्हा, राज्याला अधिक महत्व कसं देता येईल, काम मार्गी लागतील आणि याच निमित्ताने पुन्हा नव्या उमेदीने विधानसभा निवडणुकीला महायुतीला सामोरं जाता येतील यासाठी माझा प्रयत्न आहे", असं अजित पवार म्हणाले आहे. तसंच मला चिंतनाची गरज नसते असा टोलाही लगावला. 


पुढे ते म्हणाले की, "छगन भुजबळ नाराज आहेत हे धादांत खोटं आहे. काही माहिती नसताना उगाच बातम्या पेरण्यात आल्या आहेत. छगन भुजबळ यांनी स्वत: आपण नाराज नसल्याचं सांगितलं आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनीही सांगितलं आहे. तरीदेखील विरोधक किंवा मग फारच जवळचे मित्र असतील हे आमचा फार विचार करतात त्यांनी अशा बातम्या पिकवल्या आहेत. त्या तसुभऱही खऱ्या नाहीत. पार्लमेंट्री बोर्डाने एकत्रित बसून हा निर्णय घेतला आहे".