शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता. भाजपासोबत जाणार असल्याचं लक्षात आल्याने शरद पवार यांनी नाराज होऊन राजीनामा दिला असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी मला अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता हेदेखील सांगितलं आहे. तसंच मी अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय भाजपासह जाण्याचा झाला असता असा खुलासा केला 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीत अनेक आरोप प्रत्यारोप केले आहेत. पहाटेचा आणि 2 जुलैचा हे दोन्ही शपथविधी शरद पवार यांना अंधारात ठेऊन घेतल्याचं त्यांनी कबूल केलं आहे. शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच दोन्ही शपथविधी झाल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. छगन भुजबळ सारखे म्हणत होते आम्ही विनंती केली, चर्चा झाली पण निर्णयावर आलो नाहीत. याचा अर्थ हाच होतो की शरद पवारांनी आपली विचारधारा कधी सोडली नाही. 


भाजपाशी चर्चा झाली असंही त्यांनी सांगितलं. मला भाजपाला विचारायचं आहे की, एकीकडे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचारी पक्ष म्हणाला होतात. आम्ही भ्रष्टाचारी असताना भाजपा चर्चेसाठी का बसले? केलेले आरोप खोटे होते तर भाजपाने माफी मागावी," अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 


"पवार साहेबांना राजीनामा द्यायचा नव्हता"


"भाजपासह जाण्याचा आग्रह होत असल्याने शरद पवार दुखावले आणि राजीनामा दिला. तुम्हाला ते नाट्य वाटत असेल पण आमच्यासाठी ते वास्तव होतं. यानंतर जनता, कार्यकर्त्यांनी त्यांना अध्यक्ष राहण्याची विनंती केली. छगन भुजबळ यांनी मंचावरच आग्रह केला होता की, कमिटी नको तुम्हीच अध्यक्ष राहा. यातून त्यांच्यातील विरोधाभास दिसून येतो," अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.  


"शरद पवारांची हुकूमशाही आहे असंही ते म्हणाले आहेत. शरद पवारांनी अध्यक्ष नेमण्यासाठी कमिटी नेमली होती. जर ते हुकूमशाह असते तर समिती नेमली असती का? त्यांनी थेट आदेशच दिला असता. छगन भुजबळ यांनीच समितीला विरोध केला होता. मग हुकूमशाह शरद पवार होते की हे लोक होते? मी येणार नाही, तुम्ही जा असं शरद पवार आम्हाला म्हणाल्याचंही छगन भुजबळ यांनी मान्य केलं आहे," असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. 


"मला अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता. मला ही ऑफर दिली गेली होती. शरद पवारांची कधीही भाजपात जाण्याची इच्छा नव्हती. मी अध्यक्ष झाल्यानंतर भाजपात जाण्याचा पहिला निर्णय झाला असता. आणि मला पक्षाच्या, वडिलांच्या विचारांशी तडजोड करणं शक्य नव्हतं. मी त्याच्यासह जगूच शकले नसते. हे फार अस्वस्थ करणारं होतं. मी सत्तेपेक्षा संघर्षाचा मार्ग निवडला. पण माझे वडील, विचार आणि तत्वांशी मी ठाम राहिले," अशी माहिती शरद पवारांनी दिली.