ठाणे : एलफिन्स्टन चेंगराचेंगरी घटनेच्या निषेधासाठी कळव्यात राष्ट्रवादीने  रेल्वे रोको आंदोलन केल्याने ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज टर्निनसकडे जाणारी लोकल सेवा खोळंबली. गर्दीच्यावेळी आंदोलन केल्याने प्रवाशांचे हाल झालेत. मात्र, दीड मिनिटात हे आंदोलन आटोपल्याने राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा फज्जा उडाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवाशांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलाय. एलफिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरिच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून कळव्यात रेल रोको आंदोलन केले. बुलेट ट्रेनचे आश्वासन देणाऱ्या सरकारने उपनगरीय सेवेचे वाटोळे केलेय. प्रवाशांच्या सोयीकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला. 


दिवा-कळवा या स्टेशनदरम्यान गर्दीमुळे प्रवासी ट्रेनमधून पडल्याच्या घटनाही घडल्यात. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासन गंभीर नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आनंद परांजपे, जितेंद्र आव्हाड, आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोमवारी रात्रीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची धरपकड सुरु केली.


दरम्यान, ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन करुन आधीच त्रस्त असलेल्या प्रवाशांची आणखी गैरसोय करणे कितपत योग्य आहे का, असा सवाल  प्रवाशांनी उपस्थित केला.