मराठा सर्वेक्षणात निष्काळजीपणा भोवला, चांगला सरकारी जॉब गेला; एका चुकीची मोठी शिक्षा
मराठा सर्वेक्षणात निष्काळजीपणा कर्माचाऱ्याच्या अंगाशी आला आहे. एका कर्मचाऱ्याची नोकरी गेली आहे.
Maratha Reservation Survey : राज्यभरात मराठा सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाचे काम सोवण्यात आले आहे. चंद्रपुरात मराठा सर्वेक्षण कार्यात निष्काळजीपणा केल्याने मनपा कर्मचाऱ्यावर निलंबणाची कारावाई करण्यात आली आहे. मुदतीत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.
मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या कामात दुर्लक्ष केल्याने सर्वेक्षण प्रगणक सुनील माळवे यांना निलंबित करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण महत्वाचे शासकीय कार्य असल्याने मुदतीत व काटेकोरपणे करण्याचे निर्देश चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण 23 जानेवारी पासुन केले जात आहे. या कामात चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 49 पर्यवेक्षक आणि 825 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना रीतसर प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले.
मात्र, प्रगणक म्हणुन जबाबदारी देण्यात आलेले सुनील माळवे यांनी प्रशिक्षण कालावधी पुर्ण करून काम स्वीकारले नाही. अनेकवेळा सुचना देऊन देखील काम सुरु न केल्याने त्यांच्यावर निलंबनाची सक्त कारवाई करण्यात आली. सर्वेक्षणात मनपा तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली असून आतापर्यंत 56 हजार 246 कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
नागरिकांचे सहकार्य मिळावे यासाठी सर्वेक्षणाची माहिती ध्वनी यंत्रणा,वृत्तपत्रे,समाज माध्यमांद्वारे सर्वत्र देण्यात आली आहे. आता सर्वेक्षणास दोन दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळाला असला तरी ते निश्चित कालावधीत व काटेकोरपणे होणे आवश्यक असल्याने कुठल्याही स्वरूपाची हयगय खपवुन घेतली जाणार नसल्याचे चंद्रपूर मनपा आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईत मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण जवळपास पूर्ण
मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले सर्वेक्षण जवळपास पूर्ण झाले आहे. मुंबईत 99.45 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यात 70.3 टक्के घरात जाऊन महापालिकेने सर्वेक्षण केले. यापैकी 19.2 टक्के घर बंद होती. तब्बल 10.5 टक्के मुंबईकरांनी सर्वेक्षण करण्यास नकार दिल्याची माहिती सर्वेक्षणाच्या आकडेवारीतुन समोर आली आहे.
पुण्यात 55% मराठा समाजाचे सर्वेक्षण पूर्ण
पुण्यात 55% मराठा समाजाचे सर्वेक्षण पूर्ण झाल आहे. मावळ तालुक्यात सर्वाधिक 81 टक्के काम पूर्ण झाल आहे. तर, मुळशी, आंबेगाव आणि इंदापूर तालुक्यात सर्वात कमी लोकांचं सर्वेक्षण करण्यात आले.