सागर आव्हाड, झी मीडिया पुणे : कोरेगाव-भीमा लढाईचा वाद आता एका पुस्तकामुळं आणखीच चिघळलाय. जयस्तंभाची जबाबदारी सांभाळणाऱ्या माळवदकर कुटुंबीयांचे सातवे वंशज असलेले अॅड. रोहन माळवदकर यांनी '1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाई वास्तव' हे नवं पुस्तक लिहिलंय. त्यावरून दलित संघटनांमध्ये संतापाची लाट उसळलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुस्तकात काय दावा करण्यात आला आहे?
कोरेगाव भीमाची लढाई पेशव्यांविरोधात नव्हती असा दावा माळवदकरांच्या पुस्तकात करण्यात आलाय. मात्र कोरेगाव भीमाची लढाई पेशवे विरुद्ध महार अशीच झाली, असा दावा आंबेडकरी नेत्यांनी केला आहे. कोरेगाव भीमाच्या लढाईत पेशवाईला आव्हान देणारे सिद्धनाक महार सातारा जिल्ह्यातील नागेवाडीचे होते. सांगलीच्या कळंबीचे सिद्धनाक महार पानिपत खर्ड्याच्या लढाईत होते. याकडं त्यांनी लक्ष वेधलं.


दलित समाज आक्रमक


दोन समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचं काम पुस्तकातून केलं जातंय असा आरोप करत दलित संघटनांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. या पुस्तकावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.



दलित समाजाच्या कार्यकर्त्यांनी या नव्या पुस्तकातील अनेक मुद्दे खोडून काढलेत. माळवदकर कुटुंबीयांनी जयस्तंभालगत केलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी आंबेडकरी जनतेनं लढा दिला. त्याच रागातून चुकीचा इतिहास लिहिण्यात आला असून जातीय सलोखा बिघडवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.  


'1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाई वास्तव' या पुस्तकांवरून सुरू झालेला वाद आता पोलीस स्टेशनच्या दारापर्यंत पोहचलाय. रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि रिपब्लिकन कामगार सेनेनं या पुस्तकाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आता यावर प्रशासन आणि सरकार काय भूमिका घेतं, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.