45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांत पूर्ण होणार; मुंबई मेट्रोच्या खाली महापालिका बांधणार उड्डाणपुल
Andheri New Flyover: जुहू सर्कलमधील वाहतुककोंडी फुटणार असल्याची शक्यता आहे. लवकरच महापालिका नवा उड्डाणपुल बांधणार आहे.
Andheri New Flyover: अंधेरीतील सी.डी. बर्फीवाला रोड ते जूहू- वर्सोवा रोड दरम्यान मेट्रो 2 मार्गिकेच्याखाली नवीन उड्डणपूल बांधण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका घेत आहे. या उड्डाणपुलामुळं जुहू जंक्शनवर होणारी वाहतुककोंडी फुटणार आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामाचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबई या संस्थेची नेमणूक प्रशासनाकडून करण्यात आली आहे. उड्डाणपुलाची प्रस्तावित जागा ही विमानतळ प्राधिकरणाची आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी पर्याय शोधण्याची विनंती विमानतळ प्राधिकरणाने पालिकेला केली होती. परिणामी, बीएमसीने आता मुंबई मेट्रो 2 बी लाईनच्या खाली उड्डाणपूल बांधण्याची व्यवहार्यता तपासण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महानगरपालिकेने 2016 मध्ये उड्डाणपुलाचे नियोजन सुरु केले होते. त्यानंतर दोन सल्लागांराची नियुक्तीदेखील केली होती. मेट्रो स्टेशनमुळं या उड्डाणपुलाचा मार्ग बदलण्यात आला होता. हा नवीन मार्ग भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीच्या जमिनीवरून जातो. जमिनीसाठी विमानतळ प्राधिकरणाला 11.16 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला जानेवारी 2023 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. या कालावधीत BMC ने 436.29 कोटी रुपये खर्चून 1.65 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्याचाही प्रस्ताव दिला होता.गेल्या तीन वर्षांत विमानतळ प्राधिकरणाने आपल्या अखत्यारित येणाऱ्या जागेमध्ये उंचीला मर्यादा असून या ठिकाणची उंची मर्यादा शून्य मीटर इतकी आहे, असे १६ मे २०२३ रोजी दिलेल्या अभिप्राय म्हटले आहे.
अंधेरी पश्चिम येथील जुहू-वर्सोवा रोड, जुहू जंक्शन परिसरात होणाऱ्या वाहतुककोंडीमुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. 10 ते 15 मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते एक तास लागतो. यामुळं नागरिकांचा वेळ तर वाया जातोच त्याचबरोबर वाहतुककोंडीचा त्रास सहन करावा लागतो. या वाहतुककोंडीवर पर्याय काढण्यासाठी सी.डी. बर्फीवाला रोड ते जूहू-वर्सोवा रोड उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय पालिका घेत आहे. यामुळं नागरिकांना विनासिग्नल व जलद पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत पोहोचता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा नवीन उड्डाणपुल 1.65 किलोमीटरचा असेल. जो जुहू विलेपार्ले डेव्हलपमेंट (JVPD) स्कीम सर्कल म्हणजेच जुहू सर्कल ते सीडी बर्फीवाला रोडवरील मेयर हॉलला जोडेल. या उड्डाणपुलामुळं जुहू ते वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंतचे अंतर फक्त 10 मिनिटांत कापता येणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी 45 मिनिटांचा कालावधी लागतो. हा उड्डाणपूल चार लेनचा असेल, प्रत्येक बाजूला दोन असतील. यामुळं नेहमी गजबजणाऱ्या जुहू सर्कलवरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल.