लातूर : मुंबई-लातूर एक्स्प्रेसचे काही महिन्यांपूर्वी कर्नाटकातील बिदरपर्यंत विस्तारीकरण करण्यात आले होते. त्यामुळे लातूरकरांनी या विस्तारीकरणाचा तीव्र विरोध करीत वेगवेगळी आंदोलनं केली होती. पुन्हा या गाडीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दरम्यान नव्या रेल्वेमंत्र्यांनी लातूरकरांना प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि भाजप खासदार सुनील गायकवाड यांनी भेटून बिदरपर्यंत झालेले विस्तारीकरण रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आता केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल झाल्यामुळे तसेच महाराष्ट्राचे सुरेश प्रभू यांचे रेल्वे खाते पियुष गोयल यांच्याकडे गेल्यामुळे या रेल्वेचे काय होणार असा प्रश्न लातूरकराना पडलाय.


त्यामुळे लातूरचे भाजप खासदार सुनील गायकवाड यांनी नवे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन मुंबई-लातूर एक्सप्रेसचे बिदरपर्यंत करण्यात आलेले विस्तारीकरण रद्द करण्याची मागणी केली आहे. 



रेल्वेमंत्री गोयल यांची भेट घेऊन त्यांनी रीतसर निवेदन देऊन लातूरकरांच्या तीव्र भावना पोहचवल्या आहेत. मुंबई-लातूर एक्सप्रेस पूर्ववत सुरु करण्यासाठी नवीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती लातूरचे भाजप खासदार सुनील गायकवाड यांनी झी २४ तासला दिली आहे.