मागच्या काही वर्षापासून फक्त राज्यातच नाही तर जगात आपण निसर्गाचा लहरीपणा अनुभवतोय. 2021 वर्षात तर हिवाळ्यातही धोधो पाऊस आपण अनुभवतोय. हे संकट निर्माण झालंय ते तापलेल्या समुद्रांमुळे. हिंदी महासागरातल्या वाढलेल्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांवर अवकाळीचं संकट वाढतच चाललं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही वर्षांपासून बळीराजावर अवकाळी पावसाचं संकट अधिकच वाढत चाललं आहे. पुढील काळात हे संकट कमी होण्याऐवजी वाढत जाणार असल्याचं समोर आलं आहे. कारण हिंदी महासागरात वाढलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे ही चिंता अधिकच वाढली आहे.  


पुण्यातील हवामान शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील एका संशोधनात हिंदी महासागरात उष्ण लाटांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आलं आहे. याचा मान्सून आणि सागरी जीवनावर वाईट परिणाम होणार असल्याची भीती या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि मासेमारी करणाऱ्यांचं टेन्शन अधिकच वाढणार आहे. 



अलिकडच्या दशकांमध्ये अरबी समुद्रातून तीव्र चक्रीवादळांची निर्मिती होत आहे. महासागरातल्या वाढत्या उष्णतेचा प्रवाळ खडकांसह सागरी जीवसृष्टीलाही धोका आहे. उष्णतेच्या लाटेदरम्यान समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढतं. पश्चिम हिंदी महासागरात उष्णतेच्या लाटेच्या घटना अधिक वाढल्या आहेत. 


तर 1982 ते 2018 या काळात उत्तर बंगालच्या उपसागरात प्रत्येक दशकात 0.5 टक्क्यांनी उष्णता वाढीच्या घटना वाढल्या.  जेजीआर ओशन्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार या काळात बंगालच्या उपसागरात एकूण 94 घटना आणि पश्चिम हिंदी महासागरात 66 घटना घडल्या आहेत. 
 
समुद्रातल्या वाढलेल्या उष्णतावाढीच्या घटनांचा थेट मान्सूनवर परिणाम होतोय. ऐन खरिपाच्या अखेरीस आणि रब्बी हंगामाच्या तोंडावर म्हणजे ऑक्टोबत ते डिसेंबर या कालावधीतच या घटना सर्वाधिक घडतात. त्यामुळे याचा थेट पिकांवर परिणाम होत असून शेतकऱ्यांना अवकाळीच्या संकटाला सामोरं जावं लागलं आहे.