पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रात्री संचार बंदी लागू करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या स्पर्धा ,खेळांचे सामने रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पनवेल महानगरपालिकेने आज रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचार बंदी लागू केली आहे. ही संचारबंदी 21 मार्चपर्यंत लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींना यामध्ये सूट असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आतापर्यंत अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लागू केले जात आहेत. लोकांमध्ये कोरोनाबाबत गांभीर्य नसल्याचं वारंवांर पुढे येत आहे. अजूनही अनेक लोकं कोरोनाला हलक्यात घेण्याची चूक करत आहे. तरुणांमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसत नाही. पण ते कोरोनाचे वाहक बनत आहेत. त्यांच्यामुळे कोरोनाचे व्हायरस घरातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. 


अनेक ठिकाणी मास्क आणि इतर कोरोनाचे नियम पाळत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. पुणे, मुंबई व्यतिरिक्त आता राज्यातील ग्रामीण भागात ही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. काल राज्यात १४ हजाराहून अधिक रुग्णांची वाढ झाली होती. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची होणारी वाढ जास्त आहे.


राज्य सरकार वांरवार याबाबत नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत असताना देखील गर्दी कमी होत नाहीये. त्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.


मुंबईत लोकलला होणारी गर्दी देखील आता वाढली आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरात कोरोनाचा धोका वाढला आहे. लॉकडाऊन नको असल्यास लोकांनी नियम पाळायला हवे. असं वारंवार मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले आहे.