कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिर्डी आणि औरंगाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू
शिर्डीत साई मंदिर प्रशासनाकडून दर्शन व्यवस्थेत बदल
शिर्डी : शिर्डीत रात्री 10 ते सकाळी 6 संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. रात्रीच्या शेजारती, काकड आरतीला आता भक्तांना प्रवेश दिला जाणार नाहीये. भक्तांना सकाळी सहा ते रात्री नऊ वाजे दरम्यानच दर्शन पासेसच वितरण केल जाणार आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत गुरुवारची पालखी काढली जाणार नाही. तसंच गुरुवार, शिनिवार आणि सुट्टीच्या दिवशी मोफत बायोमेट्रिक काऊंटरही बंद ठेवण्यात येणार आहेत. शिर्डित पायी पालख्या घेऊन येऊ नयेत असं आवाहनही करण्यात आलंय. साईबाबा संस्तानचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाडे यांनी ही माहिती दिली आहे.
औरंगाबाद शहरात देखील आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 14 मार्चपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी असेल. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा, उद्योगांना संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. औरंगाबाद शहरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील सर्व हॉटेल्स सुद्धा रात्री 10.30 पर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेली 3 दिवस औरंगाबादेत दररोज सरासरी 150 वर रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.