कणकवली : भाजपचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यावर टीका करताना माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवराळ भाषा वापरली आहे. जठार यांनी भाजपवर टीका करणाऱ्या खासदार नारायण राणे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना नीलेश राणेंचा पुन्हा तोल सुटलाय. जठार यांची कुत्रा, पाकिटमार अशा शब्दांमध्ये संभावना करताना नीलेश राणेंची जीभ सैल सुटल्याचे अनुभवायला मिळाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली. ही मागणी त्यांनी राज्य प्रभारी सरोजिनी पांडे यांच्याकडे केली होती. त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता होती. हा वाद पुढे उफाळू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. जठार यांना मुख्यमंत्र्यांनी माहिती घेण्यासाठी थेट मुंबईला बोलावून घेतले. राणे यांच्यासोबत वाद नको अशी समज जठार यांना दिली जाईल, अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली होती. राणे हे भाजपच्या ए बी फॉर्मवर खासदार झाले असून ते सातत्याने भाजपवरच टीका करत आहेत. त्यामुळे भाजपचे नुकसान होत आहे, त्यामुळे त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली.



आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणेंचा विषय आणखी तापण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचे पडसाद उमटू शकतात. राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडू शकतात. याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रमोद जठार यांनी हा वाद वाढवू नये, असे सांगण्यात आले. मात्र, नारायण राणे यांचे सुपूत्र नीलेश राणे यांनी भाजपच्या भूमिकेनंतर प्रमोद जठार यांना शिवराळ भाषा वापरल्याने हा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, प्रमोद जठार नीलेश राणे यांना प्रत्युत्तर देणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.