मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. तर माजी खासदार मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले आहे. संजय निरूपम यांच्या अनेक तक्रारी हाय कमांडकडे गेल्या होत्या. गेल्या वर्षभरात तर या तक्रारी वाढल्या होत्या. त्यांच्या नावाला अनेकांचा विरोध होता. या पार्श्वभूमीवर हाय कमांडने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची माळ पडली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतल्याने देवरा यांच्याकडून अपेक्षा वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वांना संभाळून घेणारा नेता काँग्रेसला हवा होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


संजय निरूपम यांच्या वादग्रस्त वक्तव्याने ते स्वत: आणि पक्ष देखील अनेकदा अडचणीत आला होता. तर मिलिंद देवरा हे सुशिक्षित, संयमी आणि काँग्रेस परिवाराशी जवळचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे देवरा यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली आहे. मुंबई उत्तर पश्चिम मधून निरूपम यांना उमेदवारी आहे त्यांच्याविरूद्ध शिवसेनेचे गजानन किर्तीकर उभे आहेत.