दीपक भातुसे, अमित जोशी, मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील जनतेला अधिकची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या वाढीव नुकसान भरपाईचा सुधारित आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. ३ जूनला चक्रीवादळ हे कोकण किनाऱ्यावर धडकले होते. त्यानंतर ९ जून ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चक्रीवादळग्रस्त लोंकांना वाढीव मदत देणार असल्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पंचनामे करण्याचे काम जवळपास पूर्ण झालं असून वाढीव मदत देण्याचा शासन आदेश प्रसिद्ध झाल्याने आता प्रत्यक्ष मदत लोकांना देण्याचे काम सुरू होणार आहे. 


किती आहे वाढीव मदत?


- अंशतः नुकसान झालेल्या घरांसाठी १५ हजार रुपये मदत दिली जात होती, त्यात बदल करून २५ टक्क्यापेक्षा जास्त घराचे नुकसान झाले असल्यास २५ हजार, ५० टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास ५० हजार व पूर्ण घराचे नुकसान झाले असल्यास दीड लाख रुपये मदत मिळणार.


- घरांची पडझड झाली नाही मात्र नुकसान झालं आहे त्यांना ३५ हजार रुपये मिळणार


- नुकसान झालेल्याना १० हजार रुपयांची रोख रक्कम देणार


- शेतीचं हेक्टरी नुकसान झालेल्या शेताला २५ हजाराहून 50 हजार रुपयांची मदत


- अन्नधान्य भिजले असल्यास आणि भांड्यांचे नुकसान झाले असल्यास १० हजार रुपये मदत देण्याचा सुधारित आदेश


- अंशतः नुकसान झालेल्या बोटींसाठी ४ हजार ऐवजी आता १० हजार रुपये भरपाई मिळणार


- बोटीचे पूर्ण नुकसान झाले असल्यास १० हजार रुपयांवरून २५ हजार रुपये वाढीव मदत


- मच्छिमारांच्या जाळीचे नुकसान झाले असेल तर २,५०० वरून ५ हजार रुपये वाढीव मदत


- पूर्ण जाळीचे नुकसान झाले असेल तर पूर्वी ५ हजार मदत मिळायची आता १० हजार मदत मिळणार


- रायगडसाठी ३०० कोटी, रत्नागिरीसाठी ९० कोटी निधी वाटपाला सुरुवात


- आतापर्यंत ४० टक्के बाधितांच्या खात्यात थेट मदत जमा झाली आहे.


- ३० जूनपर्यंत २ लाख कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवणार