कृष्णात पाटील, मुंबई :  निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई, कोकणासह राज्याच्या काही भागात पावसानं हजेरी लावली असली तरी आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती मान्सूनची. पण निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून स्थिर होण्यास थोडा वेळ लागेल, असं हवामान विभागानं सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिकडे वेळेवर म्हणजे १ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून अजूनही तेथेच मुक्काम ठोकून आहे. मान्सून केरळमधून तीन दिवस पुढे सरकलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याची प्रतीक्षा सगळ्यांना लागली आहे.


गेले काही दिवस कोकणासह राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. निसर्ग वादळाच्या आधी आणि नंतर कोकण आणि मुंबई परिसरात चांगल्या सरी कोसळल्या. त्यामुळे गेले काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी मान्सून लगेचच येईल का? असा प्रश्न त्यांना पडला आहे.


मान्सून कधी येणार?


याबाबत कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितले की, निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून स्थीर होण्यास वेळ लागेल. पुढचे थोडे दिवस बिनपावसाचे असतील. पावसाचे प्रमाण कमी होईल आणि मान्सून आला की पावसाचे प्रमाण वाढेल.


....तर मुंबईचे मोठे नुकसान झाले असते


शुभांगी भुते यांनी सांगितले की, हवामान विभागाने चक्रीवादळाबाबत जो अंदाज वर्तवला होता, त्यानुसार चक्रीवादळाची वाटचाल राहिली. चक्रीवादळ अलिबागच्या दक्षिणेला सरकल्याने मुंबईवरचा धोका टळला. ५० ते ६० प्रतितास वेगाने वाऱ्याने मुंबईत झाडे उन्मळून पडली. वाऱ्याचा वेग ११० किमी असता तर मुंबईत खूप मोठे नुकसान झाले असते.


निसर्ग चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग काही ठिकाणी १२५ किमी इतका नोंदवला गेला. चक्रीवादळाचे आता वादळात रुपांतर झाले आहे. आता त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होईल. पुणे आणि जवळच्या परिसरात ७५ ते ८५ किमी वेगाने वारे वाहतील, असे शुभांगी भुते यांनी सांगितले.



निसर्ग चक्रीवादळाचा रायगडला सर्वाधिक फटका बसला. पुण्यातही शहराच्या विविध भागात मंगळवारी रात्रीपासून झाडे पडण्याच्या ६० घटना घडल्या. तर खेड तालुक्यात वादळामुळे घर पडल्याने एका महिलेचा मृत्यु झाला., तर पाच लोक जखमी झाले.