मुलीच्या वडिलांचा फसवण्याचा कट, निशिकांत मोरेंच्या पत्नीचा आरोप
निलंबित डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप आहे.
पनवेल : निलंबित डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणारी अल्पवयीन मुलगी गेल्या चार दिवसापासून बेपत्ता आहे. मात्र यामध्ये मोरेंचा काहीही हात नाही. तिला गायब करून निशिकांत मोरेंना फसवण्याचा कट मुलीच्या वडिलांनीच रचलाय, असा आरोप मोरे यांची पत्नी निशिका मोरे यांनी केला आहे. विनयभंग प्रकरणाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट ठेवून ती मुलगी बेपत्ता झाली आहे. मात्र यात मोरेंना नाहक बदनाम केलं जातं आहे.
अल्पवयीन मुलगी स्वतःच आपल्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर गेली आहे. तिला गायब करण्यात मुलीच्या वडिलांचा हात आहे. मुलीच्या वडिलांकडे असलेले पैसे मागितले म्हणून विनयभंगाची खोटी तक्रार करण्यात आल्याचा दावा निशिका मोरे यांनी केला. अटक पूर्व जामीनासाठी हायकोर्टात अर्ज करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या प्रकरणात डीआयजी निशिकांत मोरे (DIG Nishikant More) यांना पोलिसांनी निलंबित केलं आहे. निशिकांत मोरे यांनी अजून पोलिसांसमोर हजर झालेले नाहीत.
२६ डिसेंबर २०१९ ला तळोजा पोलीस स्थानकात तरुणी आणि तिच्या वडिलांनी निलंबित डीआयजी निशिकांत मोरेच्या विरोधात पॉक्सो कायद्या अंतर्गत एक गुन्हा दाखल केला होता. ही तक्रार घटनेच्या ६ महिन्यानंतर दाखल करण्यात आली.
५ जून २०१९ ला जन्मदिवशी निलंबित डीआयजी मोरे यांनी तरुणीच्या चेहऱ्यावर केक लावल्यानंतर चुकीची हरकत केली. दोन्ही परिवारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संपत्तीचा वाद सुरु असल्याचं देखील बोललं जातं आहे. पण आता या प्रकरणातील तरुणी गायब असल्याने प्रकरण आणखी गंभीर झालं आहे. तरुणीचा शोध घेण्यासाठी ५० ते ६० पोलीस कामाला लावण्यात आले आहेत.