कणकवली: महामार्ग उपउभियंत्यावर चिखलफेक करणारे काँग्रेस आमदार नितेश राणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश यांना ४ जुलै रोजी पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्यांची रवानगी ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली होती. ही मुदत संपल्यामुळे नितेश यांना आज पुन्हा दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी नितेश यांना जामीन मिळेल, अशी राणे समर्थकांची अपेक्षा होती. मात्र, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितेश राणे आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी मु्ंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांसाठी सरकारला जबाबदार धरत महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाने आंघोळ घातली होती. नितेश राणे यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बादलीतून आणलेला चिखल ओतला. यानंतर प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरील पुलावर बांधूनही ठेवण्यात आले होते. 


राणेंच्या 'चिखलफेकी'नंतर चंद्रकांत पाटील पीडित अभियंत्याच्या घरी


या प्रकाराबद्दल नितेश यांचे वडील नारायण राणे यांनी माफीही मागितली होती. महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आंदोलन करण्यात काही गैर नाही. मात्र, नितेशच्या समर्थकांनी केलेल्या हिंसक कृतीचे समर्थन करता येणार नाही. मी कदापि त्याला पाठिंबा देणार नाही, असे नारायण राणे यांनी सांगितले होते. 


दरम्यान, नितेश राणे यांच्या या कृतीचा महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाकडून जोरदार निषेध करण्यात आला होता. नितेश राणे यांच्याविरोधात या कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.