नागपूर :  राज्यातले सगळे सिंचनाचे सगळे प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलीय. ते नागपुरातल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मंत्रिपदांच्या वाटपात नितीन गडकरींकडे रस्ते वाहतूक व महामार्ग तसंच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर आणि मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नितीन गडकरी पहिल्यांदाच नागपुरात आले. त्यांचं विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी माध्यमांशी बोलताना लघू उद्योग आणि रोजगार निर्मिती करणं हे माझ्यापुढचं लक्ष्य असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. अजून कोणतंही टार्गेट सेट केलेलं नाही. नवीन योजना आणायच्या आहेत. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य दिलं जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. 



विविध भागात रस्त्यांची कामं सुरू करण्यात आली आहेत. रस्त्यांच्या लगत १२५ कोटी वृक्ष लागवड करणार असल्याचं लक्ष्य आहे असंही गडकरींनी म्हटलं आहे. येत्या तीन वर्षात सगळ्या महामार्गांची कामं पूर्ण होतील असंही त्यांनी म्हटलं आहे.


लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये नागपूर मतदार संघात भाजपच्या नितीन गडकरींनी काँग्रेसच्या नाना पटोलेंवर दणदणीत विजय मिळवलाय. २०१४ सालीही नागपूरमधून नितीन गडकरींनी काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांचा २,८४,८२८ मतांनी पराभव केला होता.