गडकरी इफेक्ट... अवघ्या चार वर्षांत `नागपूर मेट्रो` रुळावर
नागपूर रेल्वे उद्घाटनाआधीच फायद्यात आहे, हे त्याचं महत्त्वाचं आणि उल्लेखनीय वैशिष्ट्यंच म्हणावं लागेल
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : वेगवान प्रवासाचं स्वप्न नागपूरकरांनी पाहिलं आणि ते आज प्रत्यक्षातही येतंय... उद्घाटनासाठी मेट्रो सज्ज झालीय. तशा मेट्रो दिल्ली, मुंबईतही धावते पण नागपूरची मेट्रो सर्वार्थानं वेगळी आहे. काम सुरू झाल्यापासून चार वर्षांत ती प्रत्यक्ष धावायलाही लागली... यालाच म्हणतात गडकरी इफेक्ट... गडकरींच्या कल्पनेतून धावणारी मेट्रो स्मार्ट आहे. पर्यावरणपूरक आहे... ती ६५ टक्के सौरऊर्जेवर चालणार आहे. पाहुयात काय आहेत नागपूर मेट्रोची वैशिष्ट्ये...
हिरवे खांब
मेट्रो रेल्वेच्या पिलरवर 'व्हर्टिकल गार्डन' साकारण्यात आलंय. या खांबांवरच्या उद्यानामुळे मेट्रोचे खांब हिरवे आणि देखणे झालेत.
ई सायकल - ई स्कूटर
मेट्रोच्या प्रत्येक स्थानकावर ई सायकल आणि ई स्कूटरची सुविधा आहे.
नारीशक्ती
प्रत्येक नागपूर मेट्रोमधला एक डबा नारीशक्ती या नावानं महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलाय.
सुरू होण्याआधीच मेट्रो फायद्यात
व्यावसायिकदृष्ट्या सुरुवात होण्यापूर्वीच नागपूर मेट्रोला विविध स्रोतांच्या माध्यमातून १३९ कोटींचा महसूल मिळालाय
प्रत्येक स्थानकाला वेगळी थीम
मेट्रोचं प्रत्येक स्टेशन हे एका खास थीमवर साकरण्यात आलंय. सध्या तयार असलेली खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ आणि एअरपोर्ट ही मेट्रो स्टेशन्स वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक आहेत.
मेट्रो कशी असावी, याचं नागपूर मेट्रो हे उत्तम उदाहरण आहे. गडकरींसाठी विरोधकांकडून बाकं का वाजवली जातात, याचंही हे उत्तम उदाहरण आहे.