Nitin Gadkari : औरंगाबाद येथील दीक्षांत सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी (Governor Bhagat Singh Koshyari) केलेल्या विधानामुळे नवा वाद उफाळून आलाय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात त्यांच्याविरोधात आंदोलने करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उल्लेख करत राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) हे विधान केले होते. या सर्व वादावर नितीन गडकरी यांनी अतिशय बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या आई-वडिलांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे, अशी प्रतिक्रिया व्हिडीओच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरी यांच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या ट्विटमध्ये नितीन गडकरी यांनी त्यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ ट्विट केलाय. यामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 30 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये नितीन गडकरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना दिसत आहेत. "छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे हो! आमच्या आई-वडिलांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचं जीवन आमचं आदर्श आहे," असे नितीन गडकरी म्हणताना दिसत आहेत.



काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?


"आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला तुमचा फेव्हरेट हिरो कोण असे विचारायचे तेव्हा कुणाला सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरु चांगले वाटायचे. पण मला असं वाटतंय की जर तुम्हाला कोणी विचारलं की तुमचा आदर्श कोण तर बाहेर जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला मिळून जातील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. नव्या युगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉक्टर नितीन गडकरी पर्यंत इथेच आदर्श मिळतील," असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते.


राज्यपालांच्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया


"जोपर्यंत चंद्र आणि सूर्य, या पृथ्वीवर आहे तो पर्यंत महाराष्ट्र आणि देशाच्या आमच्या सगळ्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजच हिरो आहेत याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. राज्यपालांच्या मनात देखील काही शंका नाही. राज्यपालांच्या बोलण्याचे अर्थ निश्चितच वेगवेगळे अर्थ काढण्यात आले आहे. मला वाटत की, त्यांच्या मनात असे कोणतेही भाव नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श देशात आणि महाराष्ट्रात असू शकत नाही," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.


राज्यपाल काहीतरी बोलतात आणि फडणवीस पाठराखण करतात - छत्रपती संभाजीराजे


"देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया मी पाहिली. देवेंद्र फडणवीस त्यांना का पाठीशी घालत आहेत? फडणवीस हे अभ्यासू व्यक्ती महत्त्व आहेत. त्यांच्या पक्षातील माणूस आहे म्हणून पाठराखण केली जात आहे का? देवेंद्र फडणवीसांनी ते प्रवक्ते शिवभक्तांची माफी कशी मागतील हे पाहणे महत्त्वाचे आहे," असे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय.