जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर: रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतलेत. यापैकी एक म्हणजे ट्रकचालकांसाठी देशव्यापी डोळे तपासणी आणि निशुल्क चष्मेवाटप अभियान. या अभियानाचा शुभारंभ नागपुरात करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्रं-दिवस सतत रस्त्यावर ट्रक चालवण्यामुळे ट्रक चालकांच्या डोळ्यांवर याचा विपरीत परिणाम होतो. वेळेअभावी दवाखान्यात जाऊन डोळ्यांची नियमीत तपासणी करणं ट्रक चालकांना शक्य होत नाही. त्यामुळे अपघातांची समस्या वाढते. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारतर्फे देशातल्या ट्रक चालकांची डोळे तपासणी आणि निशुल्क चष्मे वाटप अभियान सुरू करण्यात आलं. त्याचा शुभारंभ नितीन गडकरींच्या हस्ते नागपुरातील पांजरी शिवार टोलनाक्याजवळ झाला.


डोळ्यांची नियमीत काळजी न घेतल्याने डोळ्यात कचरा जाणे, मोतीबिंदू यासारखे आजार ट्रकचालकांना नेहमी होतात. देशात दरवर्षी ५ लाख अपघातात दीड लाख लोकांचे मृत्यू होतात. डोळे तपासणीसोबतच ट्रकचालकांना प्रशिक्षित करण्यासाठी येत्या काळात २ हजार ड्रायव्हींग केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्याशिवाय ट्रक केबिन वातानुकुलीत करण्याचाही मानस होता. मात्र त्यासाठी इंधन जास्त लागत असल्याने वाहन निर्मिती कंपन्यांनी पॉवर फॅन लावला आहे.


६ ऑक्टोबरपर्यंत देशभरातील ५० ठिकाणी हे अभियान सुरू राहणार आहे. ही सर्व शिबीरं राष्ट्रीय महामार्गावर आयोजित करण्यात आली आहेत. डोळ्यांच्या आजाराखेरीज इतर उपचारही करण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त चालकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात येतंय.