`भाजपचे नेतृत्व नितीन गडकरींकडे द्या`
गडकरी असते तर मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आली असती.
यवतमाळ: आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपच्या नेतृत्वाची धुरा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवायला हवी, अशी मागणी विदर्भातील शेतकरी आणि आदिवासी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केली. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांना तसे पत्रही पाठवले आहे. त्यामुळे भविष्यात मोदी-शहा या जोडगोळीपुढे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला आलेल्या अपयशानंतर मोदी लाटेचा प्रभाव ओसरू लागल्याची चर्चा होती. मात्र, पहिल्यांदाच जाहीरपणे नेतृत्वबदलाची मागणी करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदी यांनी घेतलेला वादग्रस्त नोटबंदीचा निर्णय, घाईने लागू करण्यात आलेली जीएसटी कर प्रणाली, कृषी क्षेत्रातल्या व आर्थिक क्षेत्रात व्यापाऱ्यांना मंदीचा मागील तीन वर्षांपासून सातत्याने बसत असलेला फटका, त्यातच गॅस जोडणीचा वा मुद्रा योजनेचा ऐतिहासिक निर्णयाचा बँका व अनुदान कमी करण्याच्या वा जागतीक कच्च्या तेलाची किंमतीची वाढ हाताळण्यात आलेला अपयश, यावर संघ परीवारामध्ये चिंतन सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर किशोर तिवारी यांनी भाजपचे नेतृत्व नितीन गडकरी यांच्याकडे देण्याची मागणी केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांची धुरा जर नितीन गडकरी यांच्या खांद्यावर देण्यात आली असती तर मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली असती. तसेच छत्तीसगढ आणि तेलंगण या दोन राज्यांमध्ये भाजपाची दैना झाली नसती. देशाला विकासाची आणि युवकांना रोजगाराची गरज आहे. अशात हुकूमशाही पद्धतीने सरकार चालवणारे नेते समाजाला आणि देशाला घातक सिद्ध होतात. भारताला हा इतिहास नवा नाही. त्यासाठी भाजपने नितीन गडकरी यांच्याकडे नेतृत्व सोपवावे, अशी भूमिका तिवारी यांनी पत्रात मांडली आहे.