रत्नागिरी : बिहार निवडणूक मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मतमोजणी प्रक्रियेनंतर अखेर एनडीएने बाजी मारली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्रीपदी कोणाची घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नितीश कुमारांना एक सल्ला दिला आहे. बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 'महाराष्ट्र पॅटर्न' राबवावा आणि त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सल्ला घ्यावा असं उदय सामंत म्हणाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारच्या जनतेने एनडीएला कौल देत त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली आहे. यावर उदय सामंत रत्नागिरीत म्हणाले, 'राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी दिलेली टक्कर ही नक्कीच कौतुकास्पद आहे. बिहारमध्ये सरकार स्थापन करताना नितीश कुमार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सल्ला घ्यायला हवा.' असं सामंत म्हणाले.


शिवाय राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्यासारखं खंबीर नेतृत्व केलं तर राज्यातील महाविकास आघाडीसारखा पॅटर्न  बिहारमध्येही निर्माण होऊ शकतो असं देखील सामंत म्हणाले.


तेजस्वी यादव यांचा पक्ष आरजेडीने बिहारमध्ये १४४ जागा लढवल्या आणि ७५ जागा जिंकल्या. बिहारमधील आरजेडी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये रेकॉर्ड करत २५१ प्रचार सभा घेतल्या. तेजस्वी यादव यांचं कौतुक शरद पवार यांनी देखील केलं.