अटल सेतूवरुन आता करा गारेगार प्रवास; NMMT सोडणार दोन बस, तिकिट किती व कुठून सुटणार? सर्व काही जाणून घ्या
Atal setu Bus Service: अटल सेतूवरुन लवकरच आता एसी बस धावणार आहेत. या बसचे तिकिट किती असेल व मार्ग कसा असेल याविषयी सविस्तर जाणून घ्या.
नवी मुंबई आणि मुंबई या दोन शहरांना जोडणाऱ्या अटल सेतू म्हणजेच शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचा अनेक प्रवाशांना फायदा झाला आहे. अटल सेतूमुळं दीड तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण होत आहे. या मार्गावरुन एसटी बस किंवा बेस्ट सुरू करावी अशी मागणी करण्यात येत होती. प्रवाशाची ही मागणी लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेची एनएमएमटीची वातानुकूलित (एसी) बससेवा लवकरच सुरू झाली आहे. नेरुळ ते खारघर या मार्गावर ही सेवा सुरू होणार आहे. गुरुवारपासून या मार्गावर एसी बससेवा सुरू झाली आहे. यामुळं प्रवाशांना 20 मिनिटांत मुंबई गाठता येणार आहे.
नवी मुंबईतील अनेक रहिवाशी कामासाठी मुंबईत येतात. तर अनेक नोकरदारांना मंत्रालयात रोजचे येणे असतेच. रस्ते मार्गे किंवा रेल्वेने मुंबईत येणे खर्चिक व वेळखाऊदेखील आहे. आता अटल सेतूमुळं प्रवास सोप्पा झाला आहे. वाहतूक कोंडी नसल्यामुळं 20 मिनिटांत मुंबईत पोहोचता येते. तसंच, इंधनाचीही बचत होते. नवी मुंबईतील प्रवाशांनी अटल सेतूवरुन जाणाऱ्या बसच्या सुविधेमुळं प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तसंच, नवी मुंबईतील प्रवाशांना कमीतकमी वेळेत मंत्रालय गाठणे शक्य होणार आहे. एनएमएमटी प्रशासनाकडे मंत्रालयात जाण्यासाठी बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही सुविधा गणेशोत्सवापासून सुरू करण्यात आली आहे. अटल सेतूमार्गे मुंबई गाठता येणार आहे.
अटल सेतूवरुन बस क्रमाक 116 आणि 117 अशा दोन बस चालवण्यात येणार आहे. एनएमएमटीची बस क्रमाक 116 ही नेरूळ बस स्थानक (पूर्व) ते मंत्रालय उलवे मार्ग मोठा उलवा गाव, प्रभात हाईट्स, रामशेठ ठाकूर स्टेडियम, खारकोपर रेल्वे स्थानकामार्गे अटल सेतूवरुन मंत्रालयात जाणार आहे. आठवड्यात सोमवार ते शनिवार अशी ही बससेवा उपलब्ध असेल तर बसचे भाडे 230 रुपये इतके असणार आहे. तर, 117 क्रमांची बस खारघर सेक्टर 35 ते मंत्रालय मार्गे पनवेल, पळस्पे, गव्हाण टोल नाका खारघर येथून उत्सव चौकस आसूडगाव अगार हायवे, पनवेल बस स्थानक, पळस्पे फाटा, करंजाडे फाटामार्गे अटल सेतूवरुन मंत्रालयापर्यंत धावणार आहे. एनएमएमटीच्या या बस क्रमांकावर प्रवासी भाडे 270 रुपये इतके आहे.
बस मार्ग क्रमांक 116 ची पहिली सेवा नेरूळ बसस्थानक येथून मंत्रालयासाठी सकाळी 7.55 वाजता सुटेल, मंत्रालय ते खारकोपर रेल्वे स्थानक बससेवा सकाळी 9.45 वाजता सुटेल आणि खारकोपर स्थानक ते मंत्रालय बससेवा संध्याकाळी 5.20 वाजता सुटेल. मंत्रालय ते नेरुळ बसस्थानक सेवा संध्याकाळी ६.२५ वाजता सुटेल. खारघर सेक्टर 35 ते मंत्रालय दरम्यान बस मार्ग क्रमांक 117 सकाळी 7.40 वाजता सुटेल आणि मंत्रालय ते खारघर परतीचा प्रवास संध्याकाळी 6.15 वाजता सुटेल.
दरम्यान, १२ जानेवारी २०२४ रोजी अटल सेतूचे लोकार्पण करण्यात आले आणि १३ जानेवारी रोजी हा सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 13जानेवारी २०२४ ते २५ ऑगस्ट २०२४ या सात महिन्यांच्या कालावधीत या सेतूवरून ५०,०४.३५० वाहनांनी प्रवास केला आहे. अटल सेतूमुळे दक्षिण मुंबई ते पनवेल, पुणे व नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाच्या वेळात किमान अर्ध्या तासाची बचत होत आहे. बेस्ट, एनएमएमटी बसेस, तसेच एमएसआरटीसीच्या शिवनेरी बस, तसेच इतर खासगी व व्यावसायिक वाहने अटल सेतूचा नियमित वापर करतात.