पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना यंदा बोनस नाही...
`कर्ज काढून सण साजरा करु नका....` असा सल्ला अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.
पुणे : 'कर्ज काढून सण साजरा करु नका....' असा सल्ला अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. पीएमपीएल कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी बोनस मिळतो. पण यावर्षी तो मिळण्याची शक्यता नाही. कारण, तोट्यातील पीएमपीएल बोनस देऊ शकत नाही, अशी मुंडे यांची भूमिका आहे.
पीएमपीएलचा संचित तोटा पोहचलाय ३४३ कोटींवर आणि तो वाढतच आहे. या दिवाळीतही बोनस दिला तर, या तोट्यात ३५ कोटींची भर पडेल. मागची दहा वर्षे कर्ज काढून सण साजरा करत आहात. पण कर्ज काही कमी होत नाही. त्यामुळं यावर्षी बोनस नाही, अशी मुंडे यांची भुमिका आहे.
पीएमपीएलचे नऊ हजार कर्मचारी आहेत. मुंडे बोनस द्यायला तयार नाहीत म्हणल्यावर कामगार संघटनेनं कामगार न्यायालयात धाव घेतली. तिथं त्यांच्या बाजूंन निकाल लागला आहे. पण मुंडे या निर्णयाला हाय कोर्टात आव्हान देणार आहेत. त्यामुळे बोनससाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याच्या तयारीत कामगार संघटना आहेत.
बोनस मिळवण्यासाठी कामगारांना न्यायालयीन लढ्याबरोबरच आणखी एका ठीकाणाहून अपेक्षा आहे. ती म्हणजे पीएमपीएलच्या संचालक मंडळाकडून. पीएमपीएलच्या संचालक मंडळात दोन्ही महापालिकांचे महापौर, आयुक्त, स्थायी समीतीचे अध्यक्ष आहेत. बोनसच्या विषयावर संचालक मंडळाची शुक्रवारी बैठक होणार आहे. त्यात बहुमताने निर्णय झाला तर कामगारांना बोनस मिळू शकतो. अन्यथा बोनसचा वाद वाढण्याची शक्यता आहे.