भंडारा : राज्यातील कोरोनाचा आलेख कमी होत असून गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येतही घट होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला असून भंडारा हा राज्यातील पहिला कोरोनामुक्त जिल्हा ठरला आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात शून्य कोरोनारुग्ण आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडारा जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण 24 एप्रिल रोजी आढळला आणि त्यांनतर जिल्ह्यात कोरोनाचं थैमान सुरु झालं. कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असून शेवटचा रुग्ण 23 जुलैला आढळला होता. आज हा रुग्ण कोरोनामुक्त झाला असून त्याला सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आताच्या घडीला जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही. 


जिल्ह्यात आतापर्यंत 59 हजार 809 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते, तर 1 हजार 133 लोकांचा कोरोणामुळे मृत्यू झाला. 58 हजार 678 रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत. त्यामुळे आता भंडारा जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये आला आहे. 


जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत जिल्हाभर उपाययोजना राबविल्या होत्या, तसंच जे नागरिक कोरोना बाधित आढळले तिथल्या परिसराला कंटेनमेंट झोन करत उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे आज भंडारा जिल्हा महाराष्ट्रातला पहिला कोरोनामुक्त जिल्हा ठरला आहे.


धुळे राज्यातील पहिलं कोरोनामुक्त शहर


दरम्यान, धुळे हे राज्यातलं पहिलं कोरोनामुक्त शहर बनलंय. शहरात 25 जुलैपासून एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. तर 3 ऑगस्टपासून शहरात कोरोना रुग्णही नाहीत. योग्य नियोजन, कडक लॉकडाऊन आणि लसीकरणाचं चांगलं प्रमाण, यामुळे शहर कोरोनामुक्त झालं आहे. तरीही पालिकेनं शहरात कोरोना चाचण्या सुरुच ठेवल्या आहेत.