प्रशांत परदेशी आणि अनिरूद्ध दवाळे, झी 24 तास : राज्यात यंदा पाऊसाचं (Maharashtra Rain) वेळेत आगमन झाला. मात्र तरीही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अपेक्षित पाऊस बरसलाच नाही. ऑगस्ट अखेर बऱ्याच भागात वरूणराजा रूसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (No district in Maharashtra received more than 60 per cent rainfall in 2021)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी 7 जूनला येणारा पाऊस यंदा जरा लवकरच आला. पावसाच्या आगमनानं भेगाळलेली भुई थंडगार झाली आणि बळीराजा मनोमन सुखावला. पण त्याच्या या सुखावर कोरड्या ढगांचं वादळ घोंगावतंय. हातातोंडाशी आलेला घास निसटून जाईल की काय,  अशी स्थिती निर्माण झालीय. ऑगस्ट महिना संपत आलाय.  तरी राज्यातील बहुतांश जिल्हे अजूनही कोरडेठाकच आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळला तर सर्वच जिल्ह्यांमध्ये खंड पडल्यानं पावसाची टक्केवारी उणे झालीय. हिरवीगार दिसणारी शेती आता करपू लागलीय. शिवाय रोग पडण्याचा धोकाही आहे.



राज्यातलं पावसाचं प्रमाण 


यंदाच्या वर्षात राज्यातल्या एकाही जिल्ह्यात 60 % हून अधिक पाऊस झालेला नाही. तर केवळ 9 जिल्ह्यात 20 ते 59% पाऊस झाला आहे. लातूर, हिंगेली, नंदूरबार, धुळे,जळगाव, बुलडाणा, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची टक्केवारी उणे आहे. तर पुणे, सांगली, अहमदनगर, सोलापूर, नांदेड, वाशिम, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. 


नापिकी, कर्जबाजारीपणा, बाजारभाव अशा दुष्टचक्रात आधीच शेतकरी पुरता नाडला गेलाय. त्यात आता कोरड्या दुष्काळाचं संकट. बळीराजाचे डोळे पुन्हा एकदा आभाळाकडे लागलेत. ढग कोरडे झालेत, त्याच्या डोळ्यात मात्र आसवांचा पूर दाटलाय.