रायगडकरांना दिलासा, जिल्ह्यातील लाॅकडाऊन विरोधानंतर हटविले
रायगड जिल्ह्यातील लाॅकडाऊन शिथिल करण्यात आले आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील लाॅकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. लाॅकडाऊन केल्यानंतरही कोरोना रूग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ तसेच जिल्ह्यातील व्यापारी आणि विविध संघटनांचा विरोध यामुळे अखेर लाॅकडाऊन हटवविण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. लॉकडाऊन उठविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेत तसे प्रशासनाला आदेश दिलेत. त्यामुळे आजपासून रायगड जिल्ह्यातील व्यवहार सामान्य झाले आहेत.
रायगड जिल्ह्यात पालकमंत्री अदिती तटकरे यांनी लॉकडाऊनचे आदेश दिले होते. तसेच त्यानंतर आणखी लॉकडाऊन वाढविण्याचा आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिला होता. मात्र, लोकांना आणि व्यापाऱ्यांचा तीव्र विरोधामुळे लॉकडाऊनच हटविण्यात आले आहे. लॉकडाऊन असताना कोरोना विषाणूचा फैलाव होत होता. रुग्णसंख्येत वाढही होत होती. या लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी आणि काही संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन दिवसच आधीच लॉकडाऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हटविले आहे.
रायगड जिल्ह्यात १५ जुलैच्या रात्री मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन सुरु झाले होते. ते २६ जुलैच्या रात्री मध्यरात्रीपर्यंत राहणार होते. मात्र, हे लाॅकडाऊन २४ जुलैच्या मध्यरात्रीपासून हटविण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. लोकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.