ठाण्यातील हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन (Thane Lockdown) लावण्याच्या निर्णयावर ठाणे महापालिकेनं अवघ्या काही तासांमध्ये यू-टर्न मारलाय. ठाणे शहरातील कोणत्याही हॉटस्पॉटमध्ये (Thane corona hotspots) लॉकडाऊन लागणार नाहीये. लवकरच महापालिका याबाबत पत्रक काढणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिशन बिगीन अगेनचे (Mission Begin Again) जे नियम सर्वत्र लागू आहेत, तेच ठाणे शहरातीलही सर्व भागात लागू राहतील असं महापालिकेनं म्हटलंय. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, अशा हॉटस्पॉटमध्ये नियमांचं पालन काटेकोरपणे होतंय का, यावर महापालिकेची करडी नजर असणार आहे.


ठाणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे सोमवारी महापालिकेनं पत्र काढून हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन लावण्याचं जाहीर केलेलं. 16 हॉटस्पॉट असे होते, जिथे 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन लागणार होतं. मात्र अचानक लॉकडाऊन लागल्याच्या घोषणेनं लोकांमध्ये घबराट आणि गोंधळाचं वातावरण होतं.


शिवाय राज्य सरकारकडूनही (Maharashtra Government) पालिका प्रशासनाला याबाबत विचारणा करण्यात आली. त्यामुळे एका दिवसात हा निर्णय बदलल्याचं बोललं जात आहे.


त्यामुळे आता ठाणे शहरात हॉटस्पॉट जरी असले तरी सर्व आस्थापनं सुरू राहणार आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील नियमावलीची अंमलबजावणी होते की नाही, यावर महापालिका विशेष लक्ष ठेऊन असणार आहे.