मराठवाड्यात पाणीटंचाईच्या बैठकीला लोकप्रतिनिधींची दांडी
लोकप्रतिनिधीच शासकीय महत्वाच्या बैठकांनाही दांडी मारत असतील तर यांना नक्की दुष्काळाची जाणीव आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशाल करोळे औरंगाबाद : औरंगाबादेत आज मराठवाड्याच्या पाणी टंचाईबाबत पाणीपुरवठा मंत्र्यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. मात्र मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी या बैठकीला दांडी मारली. दुष्काळासारख्या गंभीर विषयाचीही यांना जाणीव नसल्याचे यातून सिद्ध झाले आहे. मराठवाड्यात 8 खासदार, 48आमदार, 8 जिल्हा परिषद अध्यक्ष, आहेत. यापैकी कोणीही या बैठकीत उपस्थित नव्हते.
आज झालेल्या बैठकीत मराठवाड्यासाठी महत्वाची ठऱणाऱ्या वॉटर ग्रीडवरही चर्चा होणार होती. मात्र पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, विधासभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि फक्त 2 आमदार वगळता बाकी सगळ्याच लोकप्रतिनिधींनी या बैठकीला दांडी मारली. मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई असून त्यावर सगळ्याच पक्षाचे नेतेमंडळी तावातावानं बोलतांना दिसतात. मात्र इतक्या महत्वाच्या बैठकीसाठी एकही लोकप्रतिनिधींनी यायला वेळ मिळू नये हे धक्कादायक आहे. तसेच या बैठकीसाठी मराठवाड्यातील जिल्ह्यांचा एकही पालकमंत्री सुद्धा आला नाही. अगदी जवळच असलेल्या औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील आमदार खासदारांनीसुद्धा बैठकीला दांडी मारली.
या सगळ्यामुळे माध्यमांना उत्तर देतांना पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणिकरांची मात्र चांगलीच गोची झाली. कदाचित सगळे व्यस्त असतील असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली. फक्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. सोमवारच्या या बैठकीत पाणी पुरवठा योजनेबाबत आक्षेप द्यायचे होते. त्याबाबतच्या तक्रारी निराकरणसुद्धा इथे होणार होते. अशात लोकप्रतिनिधी या पद्धतीने शासकीय महत्वाच्या बैठकांनाही दांडी मारत असेल तर यांना नक्की दुष्काळाची जाणीव आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.