नाशिककरांनो सावधान! तुम्ही अनधिकृत इमारतीत राहता?
महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केलेल्या सर्वेक्षणात शहरातील तब्बल ५६ हजार मिळकतींची मनपाच्या दप्तरी नोंदच नसल्याची धक्कादायक माहिती उघड झालीय. त्यामुळे नाशिकच्या इमारतींची अधिकृत की अनधिकृत अशी नोंदणीच नसल्याचं उघड झालंय.
मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केलेल्या सर्वेक्षणात शहरातील तब्बल ५६ हजार मिळकतींची मनपाच्या दप्तरी नोंदच नसल्याची धक्कादायक माहिती उघड झालीय. त्यामुळे नाशिकच्या इमारतींची अधिकृत की अनधिकृत अशी नोंदणीच नसल्याचं उघड झालंय.
नाशिक महापालिकेने सुरू केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक बाब हाती आलीय. शहरातल्या तब्बल ५६ हजार इमारतींची महापालिका दफ्तरी नोंदच नाही. त्यामुळे अधिकृत की अनधिकृत याची नोंद नाही. त्याचा परिणाम असा की अनधिकृत असलेल्या किती इमारती धोकादायक आहेत याचीच माहिती नाही. त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्यांचे प्राण धोक्यात आहेत. मनपा नगरचना विभाग आणि कर विभागात समन्वय नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचं तज्ज्ञ सांगतात.
पंचवटी, सातपूर सिडको, नाशिकरोड या परिसरातल्या सहा विभागांचं सर्वेक्षण झालंय. पंचवटी आणि पूर्व विभागातल्या इमारतींचं सर्वेक्षण अजून सुरू आहे. यात आणखी १० ते १५ हजार मिळकती अनधिकृत आढळण्याची शक्यता आहे. आजवर या इमारतींची नोंदणी का झाली नाही याची चौकशी होणार असून मिळकत धारकांवर कारवाई होईल.
महापालिकेने सुरू केलेल्या सर्वेक्षणातून मनपाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. मात्र अनधिकृत इमारतींचा आकडाही समोर येणार आहे. त्यामुळे आता यापुढे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मनपा अधिकारी यांनी जागृत राहणं गरजेचं आहे.