डोक्यावर छत नाही अन् ओळखपत्र अभावी लसीकरण नाही, बेघर नागरिकांची परवड
कोरोनामुळे बेघर असलेल्या व्यक्ती अडचणीत
आतिश भोईर, डोंबिवली : अन्न, वस्त्र, निवारा या 3 माणसांच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. मात्र कोरोना आला आणि ज्यांच्याकडे आधीच्या या 3 गरजा भागवण्याइतपतही परिस्थिती नाही अशा बेघर लोकांवर तर आभाळच कोसळले. त्यामुळेच अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यामध्ये आता वैद्यकीय उपचारांचाही समावेश करण्याचीच नितांत गरज निर्माण झालीये. अन्यथा कोविड लसीकरणापासूनही हे बेघर नागरिक वंचित राहण्याची भीती आहे. आम्ही पण या देशाचेच नागरिक आहोत. आम्हाला पण लस मिळाली पाहीजे असा आर्त टाहो या 75 बेघर नागरिकांनी फोडला आहे.
डोंबिवलीच्या बेघर निवारण केंद्र हे केडीएमसी आणि गुरुकृपा विकास संस्था यांच्याकडून अंध, अपंग, वृद्ध, रस्त्याच्या कडेला रहाणारे तसेच आजारी असणारे लोकं, बेघर यांना आणून त्यांच्यावर औषध उपचार, जेवण आणि राहण्याची सोय केली गेली आहे. वृद्धांसाठी तर हे केंद्र कित्येक वर्षांपासून घरचं बनलं आहे. दोन वर्षापासून संपूर्ण देशात कोविडने थैमान घातलं आहे. यामध्ये जवळची नाती दूरवले गेली असताना ही संस्था या बेघरांना आसरा देत आहे. मात्र येथे राहणाऱ्यांपैकी 10 जणांचे ओळख पत्र बनवून चार जणांचे लसीकरण झाले आहे मात्र यातील काही जणांकडे ओळख पत्र नसल्याने त्याचं लसीकरण होत नसल्याने आमच्या नशिबाप्रमाणेच आमचे लसीकरणही अंधातरीच राहणार का असा भावुक प्रश्न ते विचारत आहेत.
कोरोना हा आजार कोणतेही ओळखपत्र किंवा पुरावा बघून किंवा कोणताही दुजाभाव ठेवून येत नाही. त्याचप्रमाणे शासनानेही लसीकरणासाठी असे कोणतेही नियम न ठेवता सरसकट प्रत्येकाला लस हे धोरण अवलंबले पाहीजे. तरच ज्यांच्या डोक्यावर स्वतःच छत नाही अशा बेघर लोकांना खरा आधार मिळेल.