वर्धेत विहिरी पडल्या कोरड्या, भरउन्हात पाण्यासाठी वणवण
अहोरात्र पाण्यासाठी भटकण्याची वेळ
वर्धा : वर्धेच्या सिंधी मेघे परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून भरउन्हात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरातील विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडल्या असून जीवन प्राधिकरण कडून १५ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरच्या पाण्यावरच नागरिकांची भिस्त असून दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.
अहोरात्र पाण्यासाठी भटकण्याची वेळ वर्धेच्या सिंधी मेघे येथील रहिवाश्यांवर आली आहे. जीवन प्राधिकरणाचा नियोजन शून्य कारभार आणि प्रशासनाचे दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या पाणीबाणीत नागरिकांना आपल्या पाण्याची चोरी होण्याची भीती असल्याने नागरिक पाण्याची साठवण केलेल्या ड्रमला कुलूप लाऊन राखण करत आहेत. महिला अबालवृद्धांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून सायकल मोटारसायकलसह मिळेल त्या वाहनाने पाणी आणावे लागत आहे.
सिंधी मेघे परिसरातील विहीर कोरड्या पडल्या आहे. मोजकेच हातपंप सुरु असून त्याला जेमतेम पाणी आहे. पाण्याचा टँकर आला की सभोवताली महिलांची झुंबड उडते. पाण्यासाठी भांडणं देखील होतात. तापमानाचा पारा ४३ डिग्री पार असला तरी पाण्यासाठी भर उन्हात नागरिकांना बाहेर पडावे लागते.
जीवन प्राधिकरणचे नियोजन कोलमडले असून नळाला पाणी येण्याची शाश्वती नाही. अशात टँकरद्वारे पाणीपुरवठा देखील पुरेसा नाही. परिणामी पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली असून प्रशासनाने पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.