पुणे : पुणे जिल्हयात १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू झाली आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. पुण्यात 2017 साली 300 तर 2018 वर्षात साधारण 225 जणांचा अपघातात मृत्यू झाला होता. पण पुणेकर मात्र आपल्या हेल्मेट न घालण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसते आहे.  हेल्मेट सक्तीविरोधी कृती समिती गुरूवारी पोलीस आयुक्तालयावर हेल्मेट न घालता दुचाकी रॅली काढणार आहे. हेल्मेट सक्ती रोखण्यासाठी पुणेकरांनी आमदार, खासदारांकडून राजकीय दबाव आणण्यासही सुरूवात केली आहे. यासाठी नवनव्या शक्कलही लढवण्यात येत आहेत. हेल्मेटसक्तीसाठी पोलीस ठाम आहेत. तर हेल्मेट विरोधी कृती समितीही संघर्षाच्या पवित्र्यात आहे.


पुण्यात आता १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू होणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेल्मेट सक्ती विरोधात मंगळवारी हेल्मेट सक्तीविरोधी कृती समितीने मिटींग घेतली होती. यामध्ये झालेल्या निर्णयानुसार हेल्मेट सक्तीविरोधात  सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  माजी महापौर अंकुश काकडे, शांतिलाल सुरतवाला, मोहनसिंग राजपाल, विवेक वेलणकर अशा महत्त्वाच्या व्यक्ती या मिटींगला उपस्थित होत्या. 


हेल्मेट न वापरणाऱ्यांना पुणे वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबरलाच मोठा दणका दिला. वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात साधारण ३० हजारांहून अधिक दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. तर ३१ डिसेंबरला एकाच दिवसांत ५ हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली होती.  


 हेल्मेट न वापरल्याने तुमच्यावर कारवाई होत असेल तर आमदाराला फोन करा असं आवाहन हेल्मेट कृती समितीने पुणेकरांना केलंय. हेल्मेटच्या नावाखाली पैसे उकळण्याचा पोलिसांचा धंदा असल्याचा आरोप कृती समितीने केलाय. हेल्मेट सक्ती मागे घेण्यासाठी निवेदन देण्यासाठी समितीतर्फे कार्यकर्ते हेल्मेट न घातला आयुक्त कार्यालयावर धडकणार आहेत. 
अपघाती मृत्यू टाळण्यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट आवश्यक आहे. पुणेकर भाजपाला निवडून देतात त्यामुळे हेल्मेटसक्तीचा आदेश काढणाऱ्या नितीन गडकरींचं पुणेकर ऐकतील, असा टोला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी लगावला.