संगीतकार नरेंद्र भिडे यांचे पुण्यात निधन
प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे (musician Narendra Bhide passes away) निधन झाले.
पुणे : प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे (musician Narendra Bhide passes away) निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. सिव्हिल इंजिनियरची पदवी घेतलेल्या नरेंद्र भिडे (Narendra Bhide) यांनी अनेक नाटक, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले आहेत. तसेच काही निवडक चित्रपटात काम केले आहे. आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. त्यांच्या पाश्चात आई-वडील पत्नी आणि दोन मुले आहेत.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यातल्या डॉन स्टुडिओ इथे ठेवण्यात येणार आहे. अंत्यदर्शन सकाळी ९ :३० वाजता कर्वे नगर येथील डॉन स्टुडिओ इथे आणि सकाळी ११ वाजता वैकुंठ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. भिडे यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे तर पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतले.
त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्स च्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांना झी गौरव (पाच वेळा), सह्याद्री सिने अवॉर्ड, राज्य नाट्य पुरस्कार ( दोन वेळा), व्ही शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, म. टा. सन्मान, राज्य चित्रपट पुरस्कार आदि विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नरेंद्र भिडे यांनी या चित्रपटांना संगीत दिले
मुळशी पॅटर्न, रानभूल, त्या रात्री पाऊस होता, हिप हिप हुरे, पाऊलवाट , अनुमती , दिल ए नादान (बायोस्कोप) , देऊळ बंद, कलम ३०२, साने गुरुजी, शासन सिंहासन, चौदहवी का चाँद, आंधळी कोशिंबीर, आघात, शेवरी, रमा माधव, एलिझाबेथ एकादशी, यशवंतराव चव्हाण, हरिशचंद्राची फॅक्टरी, मालक, मसाला, समुद्र, चाँद फिर निकला (हिंदी) याशिवाय श्वास, सरीवर सरी, माती माय सह अनेक चित्रपटांना पार्श्वसंगीत दिले. तसेच नाटकांतमध्ये कोण म्हणत टक्का दिला?, माकडाच्या हाती शॅम्पेन, काटकोन त्रिकोण, चिरंजीव आईस, चांदणे शिंपीत जा, हमीदाबाईची कोठी, जोडी तुझी माझी, एक झुंज वाऱ्याशी, गोडी गुलाबी, फायनल ड्राफ्ट, लव्ह बर्डस , व्हाईट लिली अँड नाईट रायडर, अलीबाबा आणि ४० चोर, छापा काटा, आषाढातील एक दिवस, संगीत गर्वनिर्वाण आदी.
टिव्ही मालिकांसाठी त्यांनी संगीत दिले आहे. यात अवांतिका, ऊन पाऊस, साळसुद, घरकुल, मानो या ना मानो, पळसाला पाने पाच, भूमिका, पेशवाई, नूपुर, अबोली, श्रावण सरी, सूर- ताल, कॉमेडी. कॉम, फुकट घेतला शाम, अमर प्रेम आदींचा समावेश आहे.