नवी दिल्ली : Nanar Refinery Project : महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीकोणातून मोठी बातमी. नाणार प्रकल्पाचे पुनरूज्जीवन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे संकेत केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळत आहेत. दरम्यान, केंद्रीयमंत्र्यांनी या प्रकल्पावरुन शिवसेनेला चिमटा काढला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना असा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाणार प्रकल्पाचं पुनरूज्जीवन होण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुतोवाच केले आहे. प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारचे मतपरिवर्तन होत असल्याचे संकेत मिळत आहेत, असे ते म्हणाले. 


नाणार प्रकल्पाचा आकार कमी करून तो कोकणातच उभारण्याचा विचार सुरू आहे. प्रकल्पाद्वारे राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठी भर घालण्याची आणि मोठा रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. ‘देर आए लेकिन दुरुस्त आए’ या न्यायाने सरकारच्या मतपरिवर्तनाचे स्वागतच केले पाहिजे, असे सांगत धर्मेंद्र प्रधान यांनी नाव न घेता शिवसेनेला चिमटा काढला.



नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचे आणि रोजगाराचे योगदान देण्याची क्षमता आहे. गेली काही वर्षे विरोधामुळे तो प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. मात्र, आता महाराष्ट्र सरकारचे मनपरिवर्तन होत असल्याचे दिसत असल्याचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र म्हणाले. त्यामुळे नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे ते म्हणाले.