Satara News : सुपरकारच्या किंमती एवढा  तगडा रेडा सध्या चांगलाच चर्चेत आहे. साता-यातील कृषी प्रदर्शनात चक्क दीड कोटींचा रेडा प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे. या रेड्याला पाहण्यासाठी सातारकरांनी तुफान गर्दी केली आहे. आता सातारकरांचा नाद खुळा आहेच,त्यात राजे कसं मागे राहणार. त्यामुळे रेड्याला पहायला खुद्द उदयनराजे तिथे अवतरले.


दीड कोटीचा रेडा पाहून राजे चकित


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी रेडा पाहिला आणि या कृषी प्रदर्शनाला भेट दिली. दीड कोटीचा रेडा पाहून तेही चकित झाले. त्यांनी या रेड्यासोबत फोटो सेशनही केले. 


दीड करोडचा रेडा पोसायला येतो हजारो रुपयांचा खर्च


कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावच्या विलास नाईक यांचा सहा वर्षाचा हा रेडा. दररोज 15 लिटर दूध, चार किलो पेंड,तीन किलो कणिक खाणारा धष्टपुष्ट गजेंद्र दररोज तीन किलो सफरचंदही खातो. आता दीड करोडचा रेड्याला पोसायला एवढा खर्च तर करावाचं लागणार न? 


एक रेडा घोड्यांनाही भारी पडला


काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध सारंगखेड्याच्या घोडेबाजारात रुबाबदार, वैशिष्ट्यपूर्ण घोड्यांची चर्चा होती. त्यांच्या किमतही तशाच लाख, कोटींच्या घरात. 'पद्मा' नावाच्या घोडीला तर दोन कोटींची किंमत येऊनही तिच्या मालकानं विकण्यास नकार दिला होता. अश्वशौकिनांमध्ये पद्मा आणि इतर रुबाबदार घोड्यांची मोठी चर्चा होती.  मात्र या महागड्या घोड्यांना एका रेड्यानं मागं टाकलंय. कोल्हापूरच्या एका प्रदर्शनामध्ये लाखांची गोष्ट सोडा...चक्क सव्वा नऊ कोटींचा एक रेडा आकर्षणाचा विषय ठरला होता. कोल्हापूरच्या भीमा कृषी आणि पशू प्रदर्शनामध्ये 'युवराज' हा रेडा बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. एक रेडा घोड्यांनाही भारी पडलाय, अशी चर्चा रंगली होती


सुलतान आणि कोहिनूर रेड्याची बातच न्यारी!


जालना इथं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रदर्शनात सुलतान आणि कोहिनूर या रेड्यांनी साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतल होते.  सुलतान हा रेडा हरियाणाचा आहे. सुलताननं आतापर्यंत 20 राष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग घेतला असून 17 पेक्षा अधिक पुरस्कार त्यानं मालकाला मिळवून दिले आहेत. सुलतानंच वजन 1 हजार 600 किलोग्रॅम आहे. त्यामुळे त्याची शरीरयष्टी चर्चेचा विषय बनलाय. या रेड्याची किंमत तब्बल २१ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. तर, कोहिनूर हा पंजाबमधल्या मोग्गा जिल्ह्यातला आहे.  त्याच्या मालकानं लहानपणापासूनच त्याची कुटुंबातल्या सदस्यांसारखी काळजी घेतली. कोहिनूरचं वजन आहे 1 हजार 500 किलोग्रॅम...आतापर्यंत 15 ते 20 प्रदर्शनात कोहिनूरनं सहभाग घेतला असून त्यानं चार पेक्षा अधिकवेळा ऑल इंडिया चॅम्पियशिप पटकावलीय.