नवी मुंबईतील भीषण आगीत एकाचा मृत्यू, तब्बल 7 तासांनी आगीवर नियंत्रण
Navi Mumbai Fire News : नवी मुंबईतील भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला. तर अजूनही एकजण बेपत्ता आहे. काल पावणे एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला आग लागली होती.
नवी मुंबई : Navi Mumbai Fire News : नवी मुंबईतील भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला. तर अजूनही एकजण बेपत्ता आहे. काल पावणे एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला आग लागली होती. ही आग अखेर आटोक्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी लागलेली ही आग तब्बल सात तासानंतर नियंत्रणात आली. (One Death in Navi Mumbai fire, 7 hours after fire was brought under control)
दरम्यान, आग आटोक्यात आली असली तरी आज सायंकाळपर्यंत कुलिंगचे काम सुरु राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आग लागलेल्या ठिकाणी एन एस नायर यांचा मृतदेह सापडला असून, गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अजून निखिल पाशीलकर या तरुणांचा शोध सुरु आहे. शुक्रवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीवर तब्बल 7 तासांनी नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. आग एवढी भीषण होती की आज दिवसभर कुलिंग ऑपरेशन सुरू राहणार आहे.
नवी मुंबईच्या पावणे MIDC परिसरात दुपारच्या सुमारास हे अग्नितांडव सुरु झाले. तब्बल सात कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आणि जळून खाक झाल्या. आग लागली त्यावेळी आसपास असणाऱ्या इतर चार कंपन्यांनीही पेट घेतला. त्यामुळे ही आग आणखीनच पसरली. एमआयडीसीमध्ये दोन दिवसांचा शटडाऊन असल्याने पाण्याचा तुटवडा भासला. त्यामुळे आग विझवण्यास उशीर झाला होता. अग्निशमन दलाचे सात ते आठ बंब आणि महापालिका, सिडकोच्या 15 पाण्याच्या टँकरद्वारे रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.