Bharat Gogawale News: तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल तर मी लगेच राजीनामा देतो. मला मंत्रीपद मिळणार असतानाच एका आमदाराने धमकी दिली. त्यांनाच आता मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी गौप्यस्फोट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Bharat Gogawale News:  तुम्हाला मंत्रिपद मिळणार असेल तर मी लगेच राजीनामा देतो, असं म्हणत आमच्याच एका आमदाराने धमकी दिली. त्यामुळे मला मंत्रिपद मिळू शकलं नाही आणि आता त्याच आमदाराला मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केला आहे.  अंबरनाथमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातील भाषणात गोगावले यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.


मुख्यमंत्र्यांनी मला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलं असून त्यात मी समाधानी आहे. मी कधीही काहीही मागितलं नाही. मात्र ज्या वेळेस मला मंत्रिपद देण्याची वेळ आली आणि मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं, त्यावेळेस आमच्याच एका आमदाराने 'तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल, तर मी लगेच राजीनामा देतो,' असं म्हटलं आणि त्यामुळे मला मंत्रिपद सोडावं लागलं. आज त्याच आमदारांना मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्ष केलं आहे, असा म्हणत आमदार भरत गोगावले यांनी नाव न घेता संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे. भरत गोगावले हे अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित महाड पोलादपूर माणगाववासियांच्या संवाद मेळाव्यासाठी आले होते. यावेळी बोलताना आपल्या भाषणात त्यांनी हे गौप्यस्फोट केले आहेत. 


मला आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना दोघांनाही मंत्रिपद मिळणार होतं, मात्र आम्ही मोठा त्याग केला आहे. एक आमदार तर म्हणाले की मला मंत्रिपद मिळालं नाही. तर माझी बायको आत्महत्या करेल, मग आमच्या बायकांनी काय करावं?, असंही भरत गोगावले यांनी भाषणात म्हटलं आहे. गोगावले यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हसा पिकला होता. तसंच, त्या आमदारासाठी आम्ही मंत्रीपद सोडलं कारण कुणाचं घरदार उध्वस्त व्हायला नको, असंही भरत गोगावले म्हणाले. 


दरम्यान,  आमदार भरत गोगावले यांच्या या गौप्यस्फोटानंतर आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भरत आमचा मित्र आहे असं म्हणत त्यांनी मी या सगळ्याकडे फार लक्ष देत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. भरत गोगावलेंचं विधान हे वेगळ्या अर्थाने व वेगळ्या व्यक्तीसाठी होतं. मला मंत्रीपद दिलं नसतं तर मी राजीनामा दिला नसता का. सिडकोचं अध्यक्षपद हे आत्ता दिलं आहे. माझ्यात आणि त्यांच्यात काहीच वाद नाही. आम्ही दोघ पहिल्यापासून एकत्र आहोत. भरत यांच्या तोंडून कधीतरी काहीतरी निघतं आणि त्याची बातमी होते. पण त्याच्या मनात तसं काही नसतं आणि मी त्या सगळ्याकडे फार लक्ष देत नाही. भरत आमचा मित्र आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.