नागपूर : बोगस क्रीडा प्रकरणात परभणीतून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संतोष कठाळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संतोष परभणी जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात अधिक्षक (वर्ग-2) म्हणून कार्यरत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कठाळेकडून अनेक खेळाचे बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात परभणी येथून कल्याण मुरकुटे या बोगस खेळाडूलाही अटक करण्यात आली होती, झी 24 तास सातत्याने याप्रकरणाचा पाठपुरवा करत आहे. बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक झाली आहे. 


राज्यात काही दिवसांपूर्वी बोगस क्रीडा प्रमाणपत्राचा घोटाळा उघडकीस आला. तब्बल २५९ जणांनी ट्रम्पोलिन आणि टंबलिंग या खेळांचे बोगस क्रीडाप्रमाणपत्र मिळवल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. राज्यातील बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश झाल्याने अनेकांच्या सरकारी नोकऱ्या जाणार आहेत.


बाजारांतून एक लाखांपासून ते तीन लाखांना ही क्रीडा प्रमाणपत्रे विकत घेतली होती. २५९ जणांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केल्यानंतर ही सगळी प्रमाणपत्र क्रीडा विभागाने रद्द केली आहेत. धक्कादायक म्हणजे या प्रमाणपत्राच्या आधारे तब्बल ३२ जणांनी विविध खात्यांत सरकारी नोकरी सुद्धा मिळवली.


राज्यात अनेकांनी बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी लाटली. यासंदर्भातल्या तक्रारी समोर आल्यानंतर क्रीडा, युवक सेवा संचलनालयानं चौकशी सुरू केली. या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.