हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे: राष्ट्रवादी कॉग्रेसला शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल शिवसेनेच्या वाटेवर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षाकडून विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडका सुरु आहे. शिरूर मतदारसंघातही शिवसेनेकडून हाच कित्ता गिरवला जात आहे. मात्र, यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यासोबत मंगलदास बांदल यांची उपस्थिती चर्चेचा विषय झाली आहे. मंगलदास बांदल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. 


शिवाजी आढळराव पाटील यांच्यासोबत ते अनेकदा दिसून आल्याने बांदल लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, असे सांगितले जाते. आगामी निवडणुकीत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेच्या तिकीटावर दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 


राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर करणार रामराम


मंगलदास बांदल हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र, ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने बांदल नाराज झाले होते. बांदल शिवसेनेत गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे.


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी दोन बडे नेते पक्षाला रामराम करणार आहेत. यापैकी रामराजे निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार, हे निश्चित झाले आहे. उद्या दिल्लीत अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल, असे सांगितले जाते.