मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु
मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु झालीय. तब्बल सहा तासांनी महामार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आलीय.
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु झालीय. तब्बल सहा तासांनी महामार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आलीय. कोकणात शुक्रवारपासून पडत असलेल्या पावसाने मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. जगबुडी नदीला पूर आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
तसंच चोरद नदीचे पाणीदेखील रस्त्यावर आलं होतं. आता हळूहळू पावसाचा जोर कमी होतोय. त्यामुळे पूराचं पाणीही ओसरत आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील एकेरी वाहतूक पोलिसांनी सुरु केलीय. पावसाळ्यात कोकणात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात . मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी मोठया प्रमाणावर उत्खनन सुरु आहे. त्यामुळे दरडी कोसळायला सुरूवात झालीय.
गुरूवारी पहाटेच्या सुमारास महाडजवळच्या केंबुर्ली येथे मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आला आणि मुंबई गोवा महामार्ग तब्बल साडेतीन तास ठप्प झाला . सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. यासाठी जे.सी.बी., पोकलेन सारख्या यंत्रांचा वापर करून मोठमोठे डोंगर पोखरले आले आहेत मात्र पोखरल्या नंतर निघालेली माती आणि मोठी दगडी बाजूला न काढल्याने दरडी रस्त्यावर यायला लागल्या आहेत . 2005 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत याच भागात दरडी कोसळून मोठया प्रमाणावर जीवीत हानी झाली होती.