अहमदनगर : घोडेगाव बाजार समितीत कांद्याला विक्रमी भाव मिळाला आहे. कांद्याला प्रतिक्विंटल २० हजार रुपये भाव मिळाला आहे. उन्हाळी कांदा बाजारात भलताच भाव खाऊ लागला आहे. नगरच्या घोडेगाव बाजार समितीत कांद्याला विक्रमी भाव मिळाला आहे. घोडेगाव बाजार समितीत कांदा २० हजार रुपये क्विंटल भावानं विकला गेला आहे. म्हणजेच कांद्याला २०० रुपये किलोचा भाव मिळाला आहे. ज्ञानेश्वर चौधरी या शेतकऱ्याचा हा उन्हाळी कांदा होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांदा सध्या चांगलाच भाव खातो आहे. फक्त बाजारातच नाही तर सोशल मीडियावर ही कांद्याची चर्चा आहे. उन्हाळी कांदा दोनशे रुपये किलोवर तर लाल कांद्यानं शंभरी गाठली आहे. 


कधी नव्हे कांद्याला विक्रमी भाव मिळतो आहे. मात्र असं असलं तरी शेतकऱ्यांकडे कांदाच शिल्लक नसल्याने भाव मिळूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा खिसा मात्र रिकामाच असल्याची परिस्थिती आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चाळीत कांदाच शिल्लक राहिला नाही. विशेष म्हणजे गतवर्षी दुष्काळी परिस्थिमुळे उन्हाळ कांद्याचे अल्प उत्पादन आलं होतं. 


गरजेपोटी शेतकऱ्यांनी हा कांदा सुरवातीलाच मातीमोल भावात विक्री केला. परतीच्या पावसाने लाल कांदा बाजारात यायला उशीर झाला. त्यामुळे उन्हाळ कांद्याला विक्रमी भाव मिळत असतांना आज शेतकऱ्यांच्या चाळीत फारसा कांदा शिल्लक नाही. त्यामुळे कांदा भावाचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच जास्त होतांना दिसतो आहे.