पारनेर : एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतून उत्पादन मिळणार की नाही ? ही चिंता सतत शेतकर्‍यांना असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हतबल होऊन अनेकजण आत्महत्येचा पर्याय निवडतात. इतके निराशेचे चित्र असताना एका शेतकर्‍याने चक्क तीन महिन्यात कोटीची कमाई केली आहे. पारनेर तालुक्यातील मुंगशी येथील शेतकरी सुनील नाना थोरात यांनी तीन महिन्यात २५ एकरमध्ये  कांद्याची लागवड केली.  कांद्याच्या पिकातून त्यांनी एक कोटी तीस लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. 


कांद्याची शेती 


मुंगशी गावाची लोकसंख्या सुमारे एक हजार आहे. येथील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या गावातील सुनील थोरात व त्यांचे दोन भाऊ असे एकत्रित कुटुंब राहतात.  


थोरात कुटुंबियाकडे सुमारे ५५ एकर शेती आहे.  भाऊ मच्छिंद्र थोरात व पोपट थोरात यांच्या मदतीने गेल्या पंधरा वर्षांपासून ते कांदा पीक घेतात. यंदा पंचवीस एकरात कांदा लागवड केली होती. जुलैमध्ये रोप तयार करून त्याची लागवड ऑगस्टमध्ये केली. जवळपास अडीच महिन्यानंतर ऑक्टोबरमध्ये कांदा काढणीस सुरुवात झाली. सुरुवातीला पाचशे गोण्या कांदा विक्रीसाठी त्यांनी पुणे मार्केटला पाठवला आहे.  


बाजरभाव चांगला 


थोरात कुटुंबीयाला ४२ रुपये भाव मिळाला. २५ जानेवारीपर्यंत सात हजार गोण्या कांदा विक्रीसाठी थोरात यांनी नेला. सरासरी तीस ते चाळीस पर्यंत भाव मिळाला. या कांदा विक्रीतून थोरात यांना एकूण उत्पन्न तब्बल एक कोटी तीस लाख रुपये इतके झाले. 


सारा खर्च वगळताही थोरात कुटुंबीयाला एक कोटी वीस लाख रुपये नफा मिळाला आहे. २५ एकर क्षेत्रातील उर्वरित ५ एकर कांदा काढणीला अजुन वेळ असल्याचे सुनील थोरात यांनी सांगितले आहे.


पावसाचा परिणाम नाही 


यंदा झालेल्या पावसामुळे आमचा कांदा काही प्रमाणात खराब झाला. परंतु जमीन निचरा होणारी असल्याने त्याचा परिणाम झाला नाही. शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक घ्यावे, परंतु पावसाळ्यात जमिनीची निवड योग्य करावी, व्यवस्थापन व नियोजन उत्कृष्ट असले पाहिजे. त्यासाठी जमिनीचा पोत चांगला ठेवला पाहिजे. एकत्र पद्धतीने शेती करावी, असा सल्ला थोरात यांनी दिला आहे. 


स्वप्नवत सारे  


कांद्याच्या शेतीतून इतके पैसे कमावले जातील हे स्वप्नातही वाटले नव्हते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. इतके पैसे संपूर्ण आयुष्यात पाहिले नाही व कांद्याचे इतके पैसे होतील हे स्वप्नात देखील वाटले नव्हते.


 गेल्या पंधरा वर्षांपासून आपण कांदा लागवड करत आहे. त्यातून दहा ते वीस लाखांपर्यंत उत्पन्न मिळायचे गेल्या दोन वर्षांपासून तर कांदा पूर्णपणे तोट्यात गेला. परंतु भावंडांना कांदा पिकाचा छंद आहे म्हणून आम्ही याही वर्षी २५ एकर कांदा लावला, अशा भावना सुनील थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.