कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल; कांद्यावरील निर्यातबंदी निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलन
कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय.
नाशिक : केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात आज नाशिकमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. कांदा उत्पादक शेतकरी आधीच अडचणीत सापडलेला असतांना केंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यानं कांद्याच्या भावात घसरण झाली असून शेतकरी हवालदिल झालेत. त्यामुळे कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र सरकारनं तात्काळ उठवावी, या मागणीसाठी काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली.
गळ्यात कांद्याच्या माळा घालून काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. केंद्रानं कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ हटवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आलीय.
दुसरीकडे, केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेनं धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर आंदोलन केलं. कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय. धुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लवकर उठवावी अशी मागणी शिवसेना धुळे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी केली आहे.
केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून सरकारने हा निर्णय तातडीने रद्द करावा या मागणीसाठी महाराष्ट्र काँग्रेसकडून निदर्शने करण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदार संघातही आज संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी शंशिकात मंगरुळे यांना, केंद्र सरकारने लादलेली कांदा निर्यातबंदी मागे घेण्यासंदर्भात विधानपरीषदेचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी निवेदन दिलं आहे. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.