निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : कांद्याला भाव अधिक भाव मिळतोय... मात्र या चढ्या भावाचा व्यापाऱ्यांनाच फायदा होताना दिसतोय.


लासलगावातील परिस्थिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्यानं गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच तीन हजाराचा टप्पा ओलांडलाय. मात्र तीन हजारांहून अधिक कमाल भाव काही ठराविक मोजक्याच कांद्याला मिळत असून बहुतेक शेतकऱ्यांना 2200 ते 2300 रुपयेच सरासरी दर प्रति क्विंटलला मिळत आहे. मात्र, तरीदेखील सरासरी भावामध्ये किरकोळ वाढ असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण दिसून येतंय.


मनमाडमधली परस्थिती


मनमाडच्या नांदगाव तालुक्यातल्या धोटाण्यातले पंडित मैफत गोरेंनी तीन एकरात उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. लागवडीसाठी त्यांना एकरी 45 हजार रुपये खर्च आला. तीन एकरात त्यांना साडे चारशे क्विंटल कांद्याचं उत्पन्न मिळालं. सुरुवातीला कांद्याला अत्यल्प भाव होता. चारशे ते सहाशे रुपये दरानं मातीमोल दरानं कांद्याची विक्री केली. त्यात जवळपास 30 ते 40 टक्के कांदा सडला तर वजनातही घट आली. या सगळ्यातून त्यांच्याकडे केवळ 30 ते 40 क्विंटल कांदा शिल्लक आहे. आता वाढलेल्या कांदा दराचा फायदा उरलेल्या कांद्याला होईल, अशी आशा त्यांना आहे.


अशीच काहिशी परिस्थिती साहेबराव जयराम कुनगर या कांदा उत्पादकाची आहे. त्यांना दीड एकरात सहा ट्रॅक्टर कांद्याचे उत्पन्न त्यांना झालं. कांदा साठवल्यास बऱ्यापैंकी उत्पन्न मिळेल अशी त्यांना भाबडी आशा होती. त्यांनी पैशाअभावी कुडाच्या झोपडीवजा चाळीत त्यांनी कांदा साठवला. मात्र त्यात एक ते दीड ट्रॅक्टर कांदा खराब झाला आणि वजनातही घट आली. त्यातच कांद्याच्या भावात घसरण होत असल्यानं आणखी भाव खाली येतील या भितीपोटी त्यांनी कमी भावात कांदा विकला. 


एकंदरीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे जेमतेम 10 टक्केच कांदा शिल्लक आहे. त्यामुळे वाढलेल्या भावाचा फायदाच होणार नाही. मात्र मातीमोल भावात व्यापाऱ्यांनी खरेदी करुन साठेबाजी करुन ठेवलेल्या कांद्याला फायदा होणार असल्यानं व्यापाऱ्यांचीच चांदी होणार आहे. सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्याला किमान हमीभाव देऊन लाभ मिळवून देण्याची गरज आहे.