नवी मुंबई : मुंबई बाजार समितीत कांदा ९० रुपये किलो झाला आहेत. तर किरकोळ बाजारात कांदा शंभरीपार गेला आहे. दसरा आणि दिवाळीच्या सणात काद्याचा भाव चढाच राहण्याचा व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, इराणमधून ६०० टन कांदा आयात करण्यात आहे. हा कांदा बंदरात दाखल झाला आहे. त्यापैकी २५ टन कांदा येथील बाजार समितीमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कांद्याचे दर कमी होणार की वाढणार, याचीच उत्सुकता आहे. इराणी कांद्याचा दर ५० ते ६० रुपये असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


कांद्याचा पुरवठा होत नसल्याने  भाववाढ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने कांदा बाजार भावात दररोज वाढ होत आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू होताच ६०० रुपये प्रति क्विंटल मागे वाढ झाली आहे. त्यामुळे कांद्याला ७ हजार ८१२ रुपये इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 
लासलगाव बाजार समितीत ३५० वाहनातून ४ हजार २०० क्विंटल कांद्याची आवक झाली या उन्हाळ कांद्याला जास्तीतजास्त ७ हजार ८१२ रुपये , सरासरी ७ हजार १०० रुपये तर कमीतकमी १५०० रुपये इतका बाजार भाव मिळाला. दरम्यान, कांदा दर वाढल्यानंतर ओरड करण्यापेक्षा ज्यांना कांदा परवड नाही त्यांनी कांदा खाणे सोडावे, असा सल्ला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.


पावसामुळे कांद्याचे उत्पादन घटले


पावसामुळे कांद्याचं उत्पादन घटले आहे. शिवाय नवा कांदा बाजारात येण्यास उशीर होणार आहे. त्यामुळे गेल्या हंगामातील उन्हाळ कांद्याला मागणी वाढली आहे. पावसामुळे नवा कांदा बाजारात येण्यास आणखी उशीर होणार आहे. नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात आताच कांदा ९० रुपये किलोच्या पार गेला आहे. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतिच्या कांद्याचे भाव १०० ते १२५ रुपयांवर गेलेत. येत्या काळात हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.


कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी ईराणहून कांदा आयात करण्यात आला आहे. पण त्याने फारसा फरक पडेल असे वाटत नाही. शेतकऱ्यांच्या चाळीतही जुना कांदा राहिलेला नाही. त्यामुळे या बाजारवाढीचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे दिसत नाही.