योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : छोट्यातली छोटी गोष्ट शोधायची असल्यास आपण गुगल (Google) चा आधार घेतो. मात्र याच गुगलमुळे आपली फसवणूक सुद्धा होऊ शकते. बँकेसंदर्भात कोणता नंबर शोधत असाल तर सावधान. या नंबरवर कॉल केला तर आपला बँक बॅलन्स सुद्धा कमी होऊ शकतो. (Online Frauds and Scams)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी काय आहे घटना?
गुगल वरून नंबर सर्च करून बँकेचं काम करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. बँकेशी संबंधित काम करत असताना नेटचा स्पीड कमी होता. काम करणं गरजेचं असल्यानं व्यावसायिकाने गुगलवर बँकेचा नंबर शोधला. हा नंबर बँकेचा कस्टमर केअरशी मिळताजुळता असल्याने मिळालेल्या नंबरवर कॉल केला आणि इथेच ती व्यक्ती फसली.


अशी करण्यात आली फसवणूक
नाशिकमधील एका व्यावसायिकाने गूगलवर बँकेचा नंबर शोधला हा नंबर बोगस नंबर होता. या नंबरवर व्यवसायिकांनी कॉल केला असता आपला आवाज येत नाही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत असं सांगून आम्ही तुम्हाला दुसऱ्या नंबर वरून कॉल करतो असं सांगण्यात आलं. समोरच्या व्यक्तीकडून त्या खातेधारकाला कॉल करण्यात आला. 


टेक्निकल प्रॉब्लेम असल्याची अडचण सांगण्यात आली. त्यानंतर खातेधारकाची सर्व माहिती घेतली गेली. ओटीपी, बँक अकाउंट नंबर, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात आली. यानंतर व्यासायिकाच्या खात्यातून 12 फेब्रुवारी रोजी वेगवेगळ्या खात्यात 23 लाख 79 हजार रुपये वर्ग करण्यात आले. याचा मेसेज खातेदाराला आल्यानंतर तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांचे नागरिकांना आवाहन
कोणताही ऑनलाईन व्यवहार करताना सतर्कता बाळगा असं आवाहन पोलिसांकडून वारंवार केलं जातं. 
- गुगलवर नंबर शोधून कॉल करत असाल तर   खात्री करून घेणे गरजेचे आहे.
- शक्य झाल्यास बँकेत जाऊनच आपली कामे करावी.
- कोणालाही आपली वैयक्तिक माहिती देऊ नये.
- online व्यवहार करताना संकेतस्थळ तपासणं गरजेचं आहे .


ऑनलाईन मूळ सर्व सोपं झालं आहे. मात्र याच ऑनलाईनचा त्रासही तेवढा वाढला आहे. ऑनलाईन व्यवहारात मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. यात फसवणूक कोणी केली याचा तपास सुद्धा लागत नाही. त्यामुळे गरज आहे ती नागरिकांनी स्वतः  सतर्क राहण्याची.