अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : Maharashtra महाराष्ट्रात एकिकडे सत्तास्थापनेचा मुद्दा थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला अतानाच इथे दुसरीकडे भाजपकडून बहुमताचा आकडा गाठण्य़ासाठी राज्यात विशेष ऑपरेशन सुरू करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. या मोहिमेला ऑपरेशन देवेंद्र आणि ऑपरेशन अजित पवार असं नाव देण्यात आलं आहे. या ऑपरेशनला कोण ऑपरेशन लोटस, तर कोण ऑपरेशन कमळ म्हणूनही संबोधत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तास्थापनेच्या गणितात बेरजेच्या राजकारणासाठी चार आमदारांना कामालाही लावण्यात आलं आहे. बहुमताची अग्निपरीक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यायची आहे. परिणामी बहुमताचा जादुई आकडा गोळा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि टीम कामाला लागली आहे. महाराष्ट्रातील याच ऑपरेशनला भाजपानं ऑपरेशन देवेंद्र आणि ऑपरेशन अजित पवार असं नाव दिलं आहे.


दरम्यान, रविवारी राजकीय घडामोडींच्या गर्दीत भाजपची दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला ऑपरेशन देवेंद्रमध्ये सहभागी असलेले आमदार उपस्थित नव्हते. ऑपरेशन देवेंद्रमध्ये गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते आणि नारायण राणेंचाही समावेश असल्याची चर्चा आहे. आशिष शेलार यांच्या वक्तव्यातूनही ही बाब स्पष्ट झाली. 



तेव्हा आता, एकीकडे भाजपाकडे बहुमताचा आकडा असल्याचा दावा करुन सरकार स्थिर आहे असं सांगतायत. दुसरीकडं आमदारांची बेगमी करण्यासाठी भाजपानं नेते कामाला लावले आहेत. त्यामुळे हे विविध नावांनी संबोधलं जाणारं आणि एकच उद्दिष्ट असणारं ऑपरेशन यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.