ठाणे: मान्सूनचं आगमन झालं तरीही ठाणे शहरातील नाल्यांची सफाई पूर्ण झालेली नाही, असा आरोप महापालिकेतील विरोधकांनी केला आहे. ठाणे पालिकेनं ८० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी नगरसेवक मुकूंद केणी, सुहास देसाई, जितेंद्र पाटील यांच्यासह शहरातील नालेसफाईची पाहणी केली. या पाहणीमध्ये ठाणे महानगर पालिकेनं केलेला नालेसफाईचा दावा फोल असल्याचंच दिसून आलं. नळपाडा आणि इंदिरानगरमधील नाल्याची गेली कित्येक वर्षे सफाईच झालेली नसल्याचं नागरिकांनी पाटील यांना सांगितलं. त्यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी चक्क नाल्यामधील गाळावरच प्रतिकात्मक क्रिकेट खेळून नालेसफाईचा दावा किती फोल असल्याचं दाखवून दिले.


गोवा, कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा इशारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, पाऊस सुरू व्हायला काही दिवसांचाच अवधी बाकी असल्याने शहर प्रशासनाने योग्य ती पावले टाकायला सुरूवात केली आहे. असे असतानाच राज्यातील काही भागात पावसाचा शिडकाव झाला आहे. तर, काही भागात पावसाचे वातावरण तयार झाले आहे. गोवा आणि कोकण किनारपट्टीवर मेनुकू चक्रीवादळचा इशारा हवामान खात्यानं आगोदरच दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळसदृश्य परिस्थितीही निर्माण झालीय. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्र खवळला आहे. या वादळ सदृश्य परिस्थितीमुळे पर्यटन आणि मासेमारीवर परिणाम झालाय. उंच लाटा समुद्र किनाऱ्यावर आदळत असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय.


विदर्भातही पावसाचा शिडकावा


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ४२-४५ डिग्री तापमानामुळं हैराण झालेल्या नागपूरकरांना शनिवारी पहिल्या पावसानं थोडाफार दिलासा दिलाय. संध्याकाळच्या वेळी अचानक आलेल्या पावसानं नागपूरकरांची त्रेधा उडाली... पण विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसानं वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण केला. या पहिल्या पावसाचा आनंद नागपूरकरांनी घेतला. पण उपराजधानीच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना अंधाराचा सामना देखील करावा लागला.