जावेद मुलाणी, झी मीडिया, इंदापूर : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन महिना उलटला तरी राज्यात मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरलं आहे. बारामतीमध्ये बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर यावरुन जोरदार टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचा मंत्रिमंडळ रखडलाय त्यामुळे नाही म्हटलं तरी विकास कामात ठप्प झाली आहेत. मुख्यमंत्र्यांवर भार वाढल्याने ते आजारी पडलेत. पण मंत्रिमंडळ विस्तार झाला असता तर कामाचे विभागणी झाली असती. पालकमंत्र्यांच्या नेमणूका झाल्या असत्या असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.


आघाडी सरकारच्या कामांना स्थगिती देण्यावरुन टीका


"सरकारे येत असतात, जात असतात पण विकास कामे चालू असतात. हे दोघे आल्यानंतर जनतेच्या विकासाच्या कामांना स्थगिती देण्याचे काम सुरू आहे. ही  कोणाची वैयक्तिक कामे होती का? पण स्थगिती दिली. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीला देखील समिती दिली आहे. असं कधी महाराष्ट्रात घडलेले नव्हतं. महाविकास आघाडी सरकारने खूप चांगले निर्णय घेतले. शिंदे सरकार हे निर्णय कोणत्याहीतून बदलते हे समजत नाही," असेही अजित पवार म्हणाले.


संविधानाने सांगितलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केले पाहिजे - अजित पवार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरच्या दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमात रात्री उशिरापर्यंत शक्तीप्रदर्शन केले होते. यावरुन त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही करण्यात आली होती. याबाबत बोलतानाही अजित पवारांनी भाष्य केले.


"आम्ही पदावर असतो त्यावेळी नियम मोडून चालत नाही. आम्ही सांगतो नियमाने वागा, आम्ही सांगतो दहाच्या पुढे स्पीकर बंद. मुख्यमंत्री फिरत असताना आता दीड दोन वाजेपर्यंत फिरतात. सभा घेतात पोलिसांना सांगावं तर पोलिसांना आदेश देणारेच नियम तोडत असतील तर पोलिसांनी काय करावे? म्हणून मध्ये राज्यपालांना भेटून सांगितलं की तुम्ही समजावून सांगा. प्रत्येकाला पक्ष गट वाढविण्याचा अधिकार आहे. पण त्या अधिकाराचे कायद्याने, संविधानाने सांगितलेल्या तंतोतंत नियमांचे पालन केले गेले पाहिजे. मग तो किती मोठा माणूस असो किंवा शेवटच्या घटकाचा माणूस असो," असे अजित पवार यांनी म्हटले आहे.